दापोली : गिम्हवणे येथील प्रियकराच्या मदतीने पतीच्या केलेल्या खुनाच्या घटनेमुळे संपूर्ण तालुका हादरून गेला आहे. या घटनेचा तपास पोलिस यंत्रणा करत आहेत. या गुन्ह्यातील पत्नीसह तिच्या प्रियकराला न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
तालुक्यातील गिम्हवणे, उगवतवाडी येथील व्यवसायिक नीलेश दत्ताराम बागकर याचा १३ जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास दापोली आंजर्ले रस्त्यावरील बायपास रस्त्यावर त्याची पत्नी नेहा व तिचा प्रियकर मंगेश चिचघरकर (रा. पालगड पाटीलवाडी) यांनी नायलॉनच्या दोरीने गळा आवळून निघृण खून केला होता. त्यानंतर त्याचा मृतदेह घटनास्थळावरून सुमारे २२ ते २५ कि.मी. अंतरावरील पालगड पाटीलवाडी येथील एका विहिरीत त्याच्या पाठीला लोखंडी पाटे बांधून फेकण्यात आला होता. ही घटना उघडकीस येण्यापूर्वी नीलेश याच्या पत्नीने आपला पती बेपत्ता असल्याचा बनाव रचत दापोली पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. मात्र, घटनेचा तपास करताना दापोली पोलिसांच्या नजरेतून नीलेशची पत्नी सुटली नाही. नीलेशच्या पत्नीने आपले दुष्कृत्य कथन केले आणि संपूर्ण घटनाच पोलिसांना सांगितली. दापोली पोलिसांनी त्या दोन्ही संशयित आरोपींना न्यायालया समोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
या खुनानंतर नीलेशचा संसार उघड्यावर पडला आहे. नीलेश आणि नेहाला दोन मुली आहेत. नीलेश याचा भाऊ दिनेश यालाही दोन मुली आहेत आणि दिनेश याची पत्नीचे निधन झाले असल्याने नीलेशच्या मुली सांभाळण्यासाठी दिनेशने असमर्थता दर्शविल्याचे बोलले जात आहे. यामुळे निलेशच्या मुलींचे पालनपोषण कोण करणार, हा यक्ष प्रश्न नातेवाईकांनाही पडला आहे. तपास पोलिस निरीक्षक विवेक अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली दापोली पोलिस ठाण्याचे सहा. पो. नि. प्रवीण देशमुख करीत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:39 AM 18/Jan/2025














