देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील प्रसिद्ध श्रीक्षेत्र मार्लेश्वर देवस्थानच्या विकासासाठी आ. शेखर निकम यांनी पुढाकार घेतला आहे. राज्याचे पर्यटनमंत्री शंभूराजे देसाई यांची आमदार शेखर निकम यांनी भेट घेतली. या चर्चेत मार्लेश्वर परिसराच्या सर्वांगिण पर्यटन विकासासाठी विशेष निधी मंजूर करण्याची विनंती करण्यात आली. याला पर्यटनमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
सह्याद्री पर्वत रांगांवर श्री मार्लेश्वर हे श्रीशंकराचे जागृत देवस्थान आहे. वर्षभर वाहणारा धारेश्वर धबधबा, अन पावसाळ्यामध्ये संपूर्ण परिसर हिरवा गार व विलोभनीय दिसतो. याची भुरळ सर्वच पर्यटकांना पडते. अशा या निसर्गान नटलेल्या मार्लेश्वर क्षेत्राचा पर्यटनदृष्ट्याविकास करण्यासाठी आ. शेखर निकम यांची धडपड सुरू आहे.
दूरवरून देव दर्शनाबरोबरच मौज मजेसाठी व वास्तव्याला येणाऱ्या पर्यटकांची निराशा होते. परिणामी हे सर्व पर्यटक गणपतीपुळे या ठिकाणी वास्तव्याला जातात. यामुळे तालुक्याची आर्थिक स्थिती कमकुवत होत आहे. याचसाठी आमदार शेखर निकम यांनी प्रादेशिक पर्यटन अंतर्गत १० कोटी रुपये निधी मंजूर करण्याची मागणी केली आहे.
या निधीतून मंदिर परिसराचा विकास, धबधब्याच्या ठिकाणी संरक्षक सुविधा, निसर्ग पर्यटनासाठी विशेष जोतींची उभारणी व पर्यटकांना प्रोत्साहन देणाऱ्या योजना राबवता येतील. पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांनी या प्रस्तावावर सकारात्मकता दर्शवत, लवकरच संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्याचे आश्वासन दिले.
श्रीक्षेत्र मार्लेश्वराला स्वतः भेट देण्याची तयारीही दर्शवली. श्रीक्षेत्र मार्लेश्वरच्या सर्वांगीण विकासासाठी मंजूर होणारा निधी फक्त धार्मिक पर्यटनालाच नव्हे, तर स्थानिक रोजगार निर्मितीलाही चालना देणार आहे. परिसरातील युवा व उद्योजकांसाठी नव्या संधी निर्माण होणार आहेत. त्यामुळे श्रीक्षेत्र मार्लेश्वर तीर्थक्षेत्राचे याचबरोबर परिसराचा विकास कधी होतोय, याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे.
मुलभूत सुविधांचा अभाव
मार्लेश्वर तीर्थक्षेत्री पर्यटनदृष्ट्या कोणत्याही मोठ्या सोयी-सुविधा नसतानाही हजारो भाविक या तीर्थक्षेत्राला भेट देतात. मार्लेश्वर परिसरात आवश्यक पर्यटन सुविधा, सुशोभीकरण, पार्किंग व्यवस्था, रस्ते विकास, स्वच्छतागृहे, वीज व पाणीपुरवठा अशा मूलभूत सुविधांचा अभाव आहे. या कारणांमुळे भाविक व पर्यटकांना अडचणींचा सामना करावा लागतो.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:57 AM 18/Jan/2025














