वडगाव येथे धरणाच्या भूसंपादनासाठी सहकार्य करा : ना. योगेश कदम

खेड : वडगाव येथे धरणाच्या भूसंपादनासाठी सहकार्य करा, एकही शेतकर्‍यावर अन्याय होऊ देणार नाही, असे आश्वासन ना. योगेश कदम यांनी येथे दिले. सोमवारी वडगाव येथे धरण बंधार्‍याच्या संदर्भात आढावा बैठक ना. कदम यांच्या उपस्थितीत झाली. त्यावेळी ते बोलत होते.

या बैठकीला उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप, तहसीलदार सुधीर सोनवणे, जल संधारण, पंचायत समितीचे अधिकारी, शिवसेना जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण, तालुका प्रमुख सचिन धाडवे, शैलेश कदम, दर्शना मोरे, महेश मोरे आदी उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांनी ना. कदम यांचा सत्कार केला.

यावेळी ना. कदम यांनी ग्रामस्थांसोबत चर्चा केली. वडगाव येथील मंजूर छोट्या धरणासाठी संपादित होणार्‍या जागेबाबत कशा प्रकारे भूसंपादन प्रक्रिया राबवण्यात येणार आहे, याची माहिती ना. कदम व अधिकारी यांनी ग्रामस्थांना दिली.

यावेळी ना. कदम म्हणाले, ज्यांची जमीन धरण बंधार्‍यासाठी संपादित होणार आहे. त्या ग्रामस्थांना जास्तीत जास्त मोबदला मिळवून देण्याचे तसेच मोबदला प्रक्रिया पार पडताना ग्रामस्थांना सरकारी कार्यालयांचे खेटे घालावे लागू नये, अशा सूचना ना. कदम यांनी यावेळी शासकीय अधिकार्‍यांना केल्या.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:45 18-01-2025