चिपळूण : परशुराम येथील रोबोकॉन स्पर्धेत एसएए पाध्ये स्कूलला विजेतेपद

चिपळूण : परशुराम येथील एसपीएम इंग्लिश मीडिअम स्कूलमध्ये जिल्ह्यातील पहिली आंतरशालेय जिल्हास्तरीय रोबोटिक्स रोबोकॉन स्पर्धा झाली. या स्पर्धेत देवरूखमधील एसएए पाध्ये स्कूलने विजेतेपद तर एसपीएम परशुराम स्कूलने द्वितीय, डेरवण हायस्कूलने तृतीय क्रमांक मिळविला, स्काई रोबोटिक्स पुणे आणि परशुराममधील एसपीएम इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या वतीने ही स्पर्धा घेण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांची सर्जनशिलता, नवकल्पना आणि तांत्रिक कौशल्यांना वाव देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनाशक्तीचा वापर करून विविध प्रकारचे रोबोट तयार करीत त्याचे सादरीकरण केले. सुरुवातीला सल्लागार मंडळाचे सदस्य अभय सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. स्पर्धेचे उ‌द्घाटन एसपीएम शाळेच्या मुख्याध्यापिका आरती खाडीलकर आणि प्रमुख संयोजक व स्काय रोबोटिक्सचे डायरेक्टर अभिजीत सहस्त्रबुद्धे आणि कृष्णमूर्ती यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कृष्णमूर्ती यांनी विद्यार्थ्यांना रोबोटिक ज्ञानाचे महत्त्व सांगितले.

माजी सभापती पूजा निकम यांनी या प्रदर्शनाला भेट दिली. स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा सायंकाळी ४ वा. झाला. यावेळी अध्यक्ष म्हणून एअर मार्शल (निवृत्त) हेमंत भागवत, प्रमुख पाहुणे म्हणून मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुनील मयेकर व डेरवण शाळेच्या संचालिका शरयू यशवंतराव, आयएमसएससीसीआरच्या समन्वयक बक्शी उपस्थित होत्या.

स्पर्धेत विजेतेपद पटकावणाऱ्या एसएए पाध्ये स्कूल देवरूखला सन्मानचिन्ह देऊन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. तसेच पहिले उत्तेजनार्थ पारितोषिक एसपीएम परशुराम स्कूल तर दुसरे उत्तेजनार्थ बक्षीस डेरवण हायस्कूलने पटकावले. या स्पर्धेसाठी काही विशेष पारितोषिकेही ठेवण्यात आली होती. यामध्ये आर. बी. शिर्के हायस्कूल रत्नागिरी, एसपीएम परशुराम, आरएसपीएम इंग्लिश स्कूल राजापूर, पटवर्धन हायस्कूल रत्नागिरी, ए.जी. हायस्कूल दापोली या शाळेतील विद्यार्थ्यांना सन्मानचिनह देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेचे संपूर्ण नियोजन स्काय रोबोटिक्सचे अभिजीत सहस्त्रबुद्धे व कृष्णमूर्ती यांनी केले. सूत्रसंचालन स्नेहल जोशी यांनी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:26 PM 20/Jan/2025