विद्यार्थ्यांनी साकारली वीस फुटी नटराजाची प्रतिमा

संगमेश्वर : सह्याद्री शिक्षणसंस्था सावर्डेच्या सह्याद्री कला महाविद्यालयातील शिल्पकलेच्या विद्यार्थ्यांनी विद्यालयाच्या वार्षिक कला प्रदर्शनानिमित्त सलग पंधरा दिवसांच्या मेहनतीतून वीस फुटी नटराजाची प्रतिमा वार्षिक कला प्रदर्शनस्थळी उभारली आहे. ही प्रतिमा पाहून प्रदर्शनाला भेट देणाऱ्या कलारसिकांनी सह्याद्री कला महाविद्यालयातील युवा कलाकारांचे अभिनंदन करून त्यांच्या कलेचे कौतुक केले आहे.

शिवाने प्रथम आपल्या तांडवातून नृत्याचा प्रारंभ केला, अशी भारतीय परंपरेतील धारणा आहे. त्याच जोडीने संगीतशास्त्राचा उगमही भगवान शिवाच्या डमरू वादनातून झाला, असे मानले जाते. या शिवमूर्तीला चार हात असून, त्याच्या चारही बाजू या अग्नीने वेढलेल्या आहेत. एका पायाखाली अपस्मार राक्षसाला दाबून ठेवलेले असून, दुसरा पाय नृत्यमुद्रेत व वर उचललेला आहे. त्याच्या हातातील डमरू हे सुजनाचे प्रतीक तर अग्नी हे विनाशाचे प्रतीक मानले जाते. या संसाराला आश्रय देण्याचे सामर्थ्य या मृतींतून दिसून येते. अज्ञान आणि दृष्ट प्रवृत्ती यावर पाय रोवून शिवनृत्य करत आहे, अशी ही प्रतिकात्मकता यात दिसून येते. चूळ राजवटीतील तांब्याची नटराज प्रतिमा हो इसवि सनाच्या दुसऱ्या शतकातील आहे असे मानले जात असून त्यामध्ये शिवाची अभय मुद्रा आहे.

सह्याद्री कला महाविद्यालयातील शिल्प व प्रतिमान बंधकला हा विषय शिकवणारे प्राध्यापक रूपेश सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा कलाकारांनी नटराजाचे हे भव्य शिल्प साकारले आहे. वार्षिक कला प्रदर्शनानिमित्त सह्याद्री कला महाविद्यालयातील विद्यार्थी दरवर्षी प्रदर्शनस्थळी कलेशी निगडित असणारे विषय भव्यदिव्य स्वरूपात साकारत असतात.

यावर्षी शिल्पकलेच्या विद्यार्थ्यांनी नटराजाचे उभारलेले वीस फूट उंचीचे भव्य शिल्प म्हणजे युवा कलाकारांमधीत कमालीची मेहनत, कल्पकता आणि जिद्दीचे प्रतीक आहे. — प्रकाश राजेशिर्के, ज्येष्ठ चित्रकार

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:23 PM 21/Jan/2025