सावर्डे : महामार्गाचे काम करत असताना खोदकामामुळे बाहेरील बांधकामांचे अथवा झाडांचे नुकसान झाले असल्यास तातडीने नुकसानग्रस्त बांधकामाचे व झाडांचे पंचनामा करून त्यांचे मूल्यांकन करण्यात यावे, असे आदेश आमदार किरण सामंत दिले. यामुळे नुकसानग्रस्ताना भरपाई मिळण्याची शक्यता आहे.
आरवली येथे राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरण कामात उड्डाणपूल बांधण्यात आला आहे. पुलाच्या दोन्ही बाजूस भराव टाकून रस्ता तयार करण्यात आला आहे. भरावाचे काम सुरू असताना पुलाच्या शेजारील लक्ष्मी पेडणेकर यांच्या घराच्या भिंतीना ठिकठिकाणी भेगा पडल्या आहेत. संपूर्ण घरच धोकादायक बनले आहे. ही बाब येथील सामाजिक कार्यकर्ते दत्ता परकर यांनी महामार्ग अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणूनही संबंधित अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. दत्ता परकर यांनी ही समस्या आमदार शेखर निकम व राजापूरचे आमदार किरण सामंत यांच्या कानावर घातली. सामंत यांनी तातडीने यामध्ये लक्ष घालून कोकण भुवन नवी मुंबई येथे संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि आदेश दिले. आमदार सामंत यांनी दिलेल्या आदेशामुळे आधिकाऱ्यानी तातडीने नुकसानग्रस्त घराची पाहणी करून नुकसानीचा पंचनामा केला. सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रांत कार्यालयाचे कांबळे, बांधकाम खात्याचे रहाटे आदी अधिकाऱ्यांनी पेडणेकर यांच्या नुकसानग्रस्त घराला भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. नुकसानीचे मूल्याकंन करून घराचा अहवाल वरिष्ठांना पाठवण्यात येईल. त्यानंतर पेडणेकर यांना लवकरच नुकसान भरपाई मिळेल, असे आधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
पेडणेकर यांच्या घराला तडे
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण कामात आरवली (ता. संगमेश्वर) येथील उड्डाणपूल भरावाचे बांधकाम करत असताना शेजारी राहत असलेल्या लक्ष्मी चारुदत्त पेडणेकर यांच्या घराला तडे जाऊन घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. पेडणेकर यांना नुकसानभरपाई मिळेल, अशी आशा निर्माण झाली आहे.
नुकसानग्रस्त घराची पाहणी करण्यास आलेल्या बांधकाम खात्याच्या आधिकाऱ्यांना उड्डाणपुलाच्या दुतर्फा जाणाऱ्या सेवा रस्त्याच्या डांबरीकरण व नाल्यासंबंधी विचारणा करण्यात आली. त्यावेळी नाल्याचे काम या आठवड्यात सुरू होईल, मात्र डांबरीकरण कामास विलंब होईल, असे आधिकाऱ्यांनी सांगितले. वहाळ फाट्याजवळील सेवा रस्त्याचे डांबरीकरण होते. मग आरवलीचे का नाही?- दत्ता परकर, सामाजिक कार्यकर्ते, आरवली
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:31 PM 21/Jan/2025














