रत्नागिरी : उज्जैन येथील महर्षी सांदिपनी राष्ट्रीय वेदविद्या प्रतिष्ठान आणि रामटेक येथील भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्राच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरीत क्षेत्रीय वैदिक संमेलनाचे आयोजन फेब्रुवारी महिन्यात करण्यात आले आहे.
७ ते ९ फेब्रुवारीदरम्यान हे संमेलन होईल.
महाराष्ट्र, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, कर्नाटक या चार राज्यांतून प्रमुख मंदिरांचे पुजारी आणि विविध वेदपाठशाळांमध्ये अध्यापक म्हणून कार्यरत असणारे तसेच वेदातील क्रमांत, घनांत असे अध्ययन पूर्ण केलेले वैदिक मान्यवर या संमेलनासाठी येणार आहेत. तीन दिवसांच्या संमेलनात ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद या ४ वेदांच्या विशिष्ट शाखांचे सामूहिक पठण होणार आहे.
संमेलन रत्नागिरी शहरातील झाडगाव येथील माधवराव मुळ्ये भवनात होणार आहे. संमेलनात वेद, वेदविज्ञान या संबंधी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. वेदाचा प्रचार व प्रसार व्हावा आणि त्यांचे महत्व जनमानसापर्यंत पोहचावे, हा या संमेलनाचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे हा संमेलनाला वेदप्रेमी रत्नागिरीकरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राच्यावतीने करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:20 21-01-2025














