मंडणगड : दुर्गम ग्रामीण भागातील श्रेयस पवार जाणार अमेरिका येथील नासा भेटीसाठी

मंडणगड : मंडणगड तालुक्यातील अतिशय दुर्गम ग्रामीण भाग जिथे भौतिक सोयीसुविधांचा, दळणवळणाचा अभाव आहे, कोणतेही नेटवर्क नाही. चहुबाजूंनी डोंगराच्या कुशीत दडलेल्या कुडूक खुर्द या गावातील विद्यार्थी प्रतिकूल परिस्थितीत आपल्या बौद्धिक गुणवत्तेच्या आधारावर थेट अमेरिका येथील नासा भेटीसाठी आपले नाव कोरतो. जिल्हा परिषद कुडूक खुर्द सातवीतील श्रेयस पवार नं. १ शाळेतील याने देदीप्यमान यश संपादन केले.

रत्नागिरी जिल्हा परिषदेने राबवलेल्या जाणू विज्ञान अनुभवू विज्ञान या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना नासा-इस्त्रो भेट हा नावीन्यपूर्ण उपक्रम गेल्या ३ वर्षांपासून राबवण्यात येत आहे. यावर्षीही विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. यामुळे ग्रामीण भागातील गुणवत्ता असणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा फायदा झाला आहे. श्रेयसने जिद्द, चिकाटी आणि मनापासून केलेले प्रामाणिक प्रयत्न याने आकाशाला गवसणी घालण्याचे हे स्वप्न सत्यात उतरवले. आपल्या कुडूक खुर्द गावाचे नाव सातासमुद्रापार अमेरिकेला हा विद्यार्थी घेऊन जाणार आहे. त्याच्या या यशामध्ये त्याचे आई-वडील, शिक्षक वैभव धुमाळ, ज्ञानेश्वर राठोड, स्मिता पाटील, जाधव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. सोवेली केंद्राच्यावतीने त्याचे अभिनंदन करण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:26 AM 22/Jan/2025