दापोली : गिम्हवणे खुनातील ‘त्या’ दोघांच्या पोलिस कोठडीत वाढ

दापोली : गिम्हवणे येथील व्यावसायिक नीलेश बावकर यांच्या खूनप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोघां संशयितांच्या पोलिस कोठडीत आणखी दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे.

मंगेश चिंचघरकर हा मंडणगड आगरामध्ये चालक म्हणून काम करत होता. तो मूळचा दापोली तालुक्यातील पालगड पाटीलवाडी येथील रहिवासी आहे. नीलेश यांचा गळा आवळून खून केल्यानंतर पालगड-मंडणगड रस्त्यावरील पालगड पाटीलवाडी येथील एका खासगी मालकीच्या विहिरीत त्याचा मृतदेह अंगाला लोखंडी पाटा बांधून फेकून देण्यात आला होता. या विहिरीत पाणीही मुबलक आहे.

विहिरीला संरक्षक कठडा नसल्याने या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ही विहीर बुजवण्यात येणार असल्याचे मंगेश याला समजले होते, अशी चर्चा सुरू आहे. याचाच फायदा घेत मंगेशने नीलेशचा मृतदेह या विहिरीत टाकण्याचा प्लॅन केला असावा, अशी दाट शक्यता आहे. विहीर बुजवल्यामुळे मृतदेह विहिरीत गाडला जाईल, असा पक्का समज मंगेशने केला होता. मात्र नीलेशचा मृतदेह सापडला आणि खूनाला वाचा फुटली. मृत निलेशच्या पत्नीसह मंगेशने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर १६ जानेवारीला दापोली न्यायालयासमोर हजर केले होते. त्यावेळी त्यांना ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. मंगळवारी पुन्हा न्यायालयात हजर केले असता त्यांच्या कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:34 AM 22/Jan/2025