सावर्डे : मुंबई-गोवा महामार्गावर रस्ता चौपदरीकरण कामात अनेक खोके, टपऱ्या, दुकाने, घरे, चहा गाडीवाले विस्थापित झाले आहेत. त्या सर्वांना योग्य नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी २५ जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती कष्टकरी संघटनेचे अध्यक्ष अशोकराव जाधव यांनी दिली.
महामार्गाच्या चौपदरीकरण कामापूर्वी रस्त्याच्या बाजूला असणारे सर्वसामान्य विक्रेते खोके, टपऱ्या व दुकाने टाकून उदरनिर्वाह करत होते. चौपदरीकरणामुळे हे सर्वजण विस्थापित झाले असून, उपासमारीची वेळ आली. त्यांना नुकसान भरपाई मिळावी म्हणून काँग्रेस आणि शेतकरी कष्टकरी संघटना म्हणून गेली पाच वर्षे लढत आहेत. त्यासाठी सुमारे शेकडो फेऱ्या भूसंपादन खाते ते कोकण भुवन, मंत्रालय ते रत्नागिरी जिल्हाधिकारी ते इंजिनियर, डेप्युटी इंजिनियर असा सर्व स्तरांवर पाठपुरावा सर्वांनी घेऊन केला. त्याला यश येत आहे, असे दिसताच काही मंडळी मीच कसा न्याय मिळवून दिला, याच्या घोषणा करत आहेत.
धरणे आंदोलनात राजापूर, लांजा, रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण व खेड या तालुक्यांतून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील सर्व विस्थापितांच्या समस्या आहेत, त्या संदर्भात सर्वांनी २५ जानेवारीला सकाळी ११ वा. रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमून बेमुदत धरणे आंदोलन करायचे आहे.
शासन सर्व विस्थापितांना नुकसान भरपाईची घोषणा न करता सुमारे ८० विस्थापितांपैकी केवळ २० विस्थापितांनाच येत्या २४ जानेवारीला नुकसान भरपाई दिली जाईल, असे जाहीर करत आहे. शासनाची ही चाल विस्थापितांमध्ये फूट पाडण्यासाठी आहे. ज्यांना २४ तारखेला नुकसान भरपाई मिळेल ते सर्व सर्वांना नुकसान भरपाई मिळेपर्यंत लढ्यात सामील होणार आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:39 AM 22/Jan/2025














