रत्नागिरी : नवनिर्माण महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त २५ जानेवारीला कार्यक्रम

रत्नागिरी : १५ वा राष्ट्रीय मतदार दिवस २५ जानेवारी रोजी साजरा करण्यात येणार आहे. मतदार दिनाचे औचित्य साधून २५ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता नवनिर्माण शिक्षण संस्थेचे एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालय, मिरजोळे येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश सुनील गोसावी, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एम. आर. सातव यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

सकाळी ११.४५ वाजता भारत निवडणूक आयोगाच्या नथिंग लाईक व्होटिंग, आय व्होट फॉर शुअर या थिमचे प्रसारण करण्यात येणार आहे. दुपारी १२ वाजता मतदारांना लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ दिली जाणार आहे. त्यानंतर मान्यवरांचे मनोगत व दुपारी १.०५ वाजता उत्कृष्ट काम केलेले बीएलओ, डाटा एन्ट्री ऑपरेटर, महाविद्यालयीन स्तरावरील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी व निवडणूक साक्षरता मंडळाचे नोडल अधिकारी आणि विविध क्षेत्रातील दिव्यांग व तृतीय पंथीय आयकॉन यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. दुपारी १.२५ वाजता जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षीय भाषणानंतर दुपारी २ वाजता आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता होईल.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:27 PM 22/Jan/2025

Arihant 2