धूतपापेश्वर मंदिराचे सुशोभिकरण ग्रामस्थांच्या सूचनेनुसार करा; आमदार किरण सामंत यांची सूचना

राजापूर : राजापूरवासीयांचे आराध्य दैवत असलेल्या श्री देव धूतपापेश्वर मंदिर आणि परिसराच्या सुशोभीकरणाच्या कामाची सोमवारी पुन्हा आमदार किरण ऊर्फ भय्या सामंत यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी स्थानिक ग्रामस्थांनी सुचविल्याप्रमाणे आवश्यक त्या सर्व कामांची पूर्तता झाली पाहिजे व नियोजित वेळेत काम पूर्ण झाले पाहिजे, अशा सूचना आ. सामंत यांनी यावेळी अधिकारी, अभियंता व संबंधित ठेकेदार यांना दिल्या. यामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

श्री देव धुतपापेश्वर मंदिर सुशोभीकरणाच्या कामात अनेक त्रृटी असून ग्रामस्थांना विश्वासात न घेता, हे काम सुरू असल्याच्या तक्रारी येथील ग्रामस्थांनी आमदार किरण ऊर्फ भैया सामंत यांच्याकडे यापूर्वी केल्या होत्या. याबाबत अधिकारी तसेच संबंधित ठेकेदार व ग्रामस्थांची संयुक्त बैठक घेवून कामाचे नियोजन करण्याबाबत सूचना आ. सामंत यांनी यापूर्वी दिल्या होत्या.

प्राचीन मंदिरांच्या जतन-संवर्धन आणि परिसर विकास कार्यक्रमाअंतर्गत श्री देव धूतपापेश्वर मंदिर आणि परिसराच्या विकासासाठी शासनाने 11 कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने तीन विभागात कामे प्रस्तावित करण्यात आलेली आहेत. यामध्ये मंदिराचा जीर्णोध्दार व पुर्नबांधकाम करणे, मंदिर परिसराचा जीर्णोध्दार व संवर्धन करण्यात येणार आहे. या कामामध्ये धुतपापेश्वर मंदिराकडे येणार्‍या मार्गावर भाविकांसाठी आवश्यक दुकान गाळ्यांची बांधणी करणे, मृडानी नदीवरील पुलाचे विद्युतीकरण व सुशोभिकरण करणे, पर्यटक व भाविकांच्या दृष्टीने परिसर विकास, विश्रामगृह तसेच प्रसाधनगृहाची दुरुस्ती, दत्त मंदिराच्या दर्शनी भागाचे सुशोभिकरण, मंदिर परिसरातील सिमेंट ब्लॉक परसबंदी काढून कातळ दगडात परसबंदी, मंदिराच्या प्रवेशद्वारापुढील मार्गाच्या सिमेंट ब्लॉक काढून जांभ्या दगडात परसबंदी करणे आदी कामे करण्यात येत आहेत.

दरम्यान, श्री धूतपापेश्वर मंदिर आणि परिसर सुशोभीकरणाचे निम्म्यापेक्षा अधिक काम पूर्ण झाले आहे. ग्रामस्थांच्या तक्रारीवरून आ. सामंत यांनी यापुर्वीही येथील पाहणी करून योग्य प्रकारे अधिकार्‍यांना काम करण्याच्या सुचना दिल्या होत्या.

यावेळी तहसीलदार विकास गंबरे, पर्यटन विभागचे अधिकारी, भाजपा जिल्हा सरचिटणीस रवींद्र नागरेकर, शिवसेना जिल्हा संघटक प्रकाश कुवळेकर, उपजिल्हाप्रमुख अशफाक हाजू यांसह धोपेश्वर ग्रामस्थ उपस्थित होते. या प्रकरणी पुन्हा एकदा ग्रामस्थांची बैठक घेऊन कामाचा आढावा घेण्यात येईल असेही आ. किरण सामंत यांनी सांगितले.

… अन्यथा गाठ माझ्याशी

सोमवारी राजापूर दौर्‍यावर आलेल्या आ. सामंत यांनी सायंकाळी श्री देव धुतपापेश्वर मंदिराला भेट दिली व कामाची पाहणी केली. यावेळी काही त्रृटी आढळून आल्याने आ. सामंत यांनी संबंधित अधिकार्‍यांना चांगलेच धारेवर धरत काम योग्य पध्दतीने करा, ग्रामस्थांना विश्वासात घेऊन करा, अन्यथा माझ्याशी गाठ आहे, असा इशारा दिला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:34 23-01-2025