रत्नागिरी : थिबा राजवाडा संगीत महोत्सवात कोल्हापूर येथील ‘रेखाटन स्केचर्स’ होणार सहभागी

रत्नागिरी : आर्ट सर्कल फाउंडेशनच्या थिबा राजवाडा संगीत महोत्सवाचे औचित्य साधून कोल्हापूर येथील ‘रेखाटन अर्बन स्केचर्स’ ग्रुपचे सर्व कलाकार सहभागी होणार आहेत. २४ जानेवारीपासून ते रत्नागिरीत येणार असून, विविध ठिकाणी स्केचिंग करणार आहेत.

कोल्हापूर येथील आर्किटेक्ट्स, चित्रकार, हौशी स्केचर्स यांनी रेखाटन नावाचा समूह जानेवारी २०१६ मध्ये सुरू केला. एकत्र येऊन चांगलं काम घडावं, नवीन स्केचर्सना स्फूर्ती मिळावी, स्केचिंग करण्यात सातत्य राहावं या हेतूने ही मंडळी दर रविवारी एकत्र येतात. या क्षेत्रातील हौशी कलाकारांसाठी तज्ज्ञ मंडळींना बोलावून त्यांच्याकडून मार्गदर्शन, चर्चा, कार्यशाळा असे उपक्रम रेखाटनच्या छताखाली होतात.

शुक्रवारी (ता.२४) स्केचिंग कलाकार थिबा राजवाडा परिसरात स्केचिंग करतील. २५ ला सकाळी कासारवेली गाव आणि संध्याकाळी पंधरामाड मिऱ्या येथे किनाऱ्यावर येऊन बंद पडलेल्या बसरा बोट येथील निसर्गरम्य किनाऱ्यावर स्केचिंग करतील. २६ जानेवारीला सकाळी मिरकरवाडा जेट्टी आणि दुपारी मलुष्टे यांच्या निवासस्थानी दोन दिवसांतील स्केचेसचे प्रदर्शन आणि चर्चा करण्यात
येणार आहे.

रत्नागिरीचा परिसर कागदावर
रत्नागिरीमधील निवडक परिसर कलाकारांकडून कागदावर रेखाटला जाणार आहे. या उपक्रमामध्ये रत्नागिरीतील स्केचर्सदेखील सहभागी होऊ शकतात. हा उपक्रम सहभागींसाठी विनामूल्य आहे. इच्छुक कलाकारांनी अनुजा कानिटकर किंवा आशर फिलिप यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आर्ट सर्कलच्यावतीने केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:24 AM 23/Jan/2025