गावतळे : दापोलीतील हरी केशव गोखले मोफत वाचनालय यांच्यावतीने रामराजे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना वाचनालयात बोलवून माहिती देण्यात आली. त्यांना आवडणारी पुस्तके वाचण्यासाठी देऊन त्या पुस्तकावरील अभिप्राय लिहून घेण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांनी वाचनालयात जाऊन पुस्तके वाचावीत यासाठी शिक्षकांनी आणि पालकांनी प्रोत्साहित करावे, असा ठराव करण्यात आला.
जिल्हा परिषद शाळा दापोली येथील विद्यार्थ्यांसाठी ‘ग्रंथालय भेट’ हा उपक्रम ४ जानेवारीला घेण्यात आला. विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीची पुस्तके वाचनासाठी देण्यात आली तसेच वाचनसंस्कृती व वाचनाचे महत्त्व या विषयी मान्यवरांकडून मार्गदर्शन करण्यात आले. १३ ला खास ‘बालवाचकांकरिता ग्रंथ प्रदर्शन’ व ‘बालवाचक मेळावा’ आयोजित करण्यात आला होता. विद्याभारती शाळेतील तिसरी व चौथीची मुले शिक्षकांसह वाचनालयात आली होती. विद्यार्थ्यांना संपूर्ण वाचनालय फिरून पाहण्याची व वेगवेगळी पुस्तके, मासिके व अन्य ग्रंथसाहित्य हाताळण्याची संधी देण्यात आली होती. बालवाचक मेळाव्यात सर्व विद्यार्थ्यांनी पुस्तक वाचनाचा आनंद घेतला. वाचनालयाच्या अध्यक्षा, संचालक, ग्रंथपाल व सर्व सहायकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शिक्षक, पालक, संचालक व वाचनालयाचे कर्मचारी यांच्या उपस्थितीत ‘शिक्षक पालक परिसंवाद’ घेण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी कशी निर्माण करता येईल, वेगवेगळ्या प्रकारचे साहित्यिक उपक्रम कसे राहता येतील याविषयी चर्चा करण्यात आली.
ज्येष्ठांसाठी विशेष नियोजन
ग्रंथालय आपल्या दारी या उपक्रमांतर्गत दापोली व परिसरातील अनेक ज्येष्ठ व्यक्तीना, त्यांच्या घरी जाऊन वाचनासाठी पुस्तके देण्यात आली व आपल्या घरी बसून, पुस्तक वाचनाचा आनंद देण्यात आला. वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी दापोलीतील शाळा, महाविद्यालयाकडून सहकार्य मिळत असल्याचे वाचनालयातर्फे सांगण्यात आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:32 PM 23/Jan/2025














