रत्नागिरी : डॉल्फिनचा गिलनेट मासेमारीला फटका

रत्नागिरी : थंडीचा जोर वाढल्यामुळे कोकण किनारपट्टीवर डॉल्फिन मासे मोठ्या प्रमाणात दाखल होऊ लागलेले आहेत. झुंडीने आलेल्या या माशांनी अनेक मच्छीमारांची जाळी फाटल्यामुळे मोठे नुकसान सहन करावे लागत आहे तसेच मिळालेले मासेही कमी होऊ लागले आहेत. गेले महिनाभर हा त्रास सहन करावा लागत असून, काही गिलनेटद्वारे मासेमारी करणाऱ्यांनी नौका बंदरात उभ्या करून ठेवल्या आहेत. सध्या मासळी कमी मिळत असल्याने बांगड्याचा दर १५० ते १६० रुपये किलोवर पोचला होता.

गेल्या काही वर्षांमध्ये कोकण किनाऱ्यावर डॉल्फिन माशांचा वावर वाढलेला आहे. सर्वसाधारणपणे हिवाळा सुरू झाला की, रत्नागिरी तालुक्यात आरे-वारे, काळबादेवी, पूर्णगड, दापोली तालुक्यात हर्णे, मुरूड, गुहागर किनाऱ्यावर डॉल्फिन मोठ्या प्रमाणात वावरत असतात. डॉल्फिन झुंडीने किनारी भागात फिरत असतात. त्याचा फटका गिलनेटद्वारे मासेमारी करणाऱ्यांना बसत आहे. गिलनेटने मासेमारी करणाऱ्या नौका १० वावापर्यंत जातात. या परिसरात हे डॉल्फिन फिरत असल्यामुळे नौकांच्या जाळ्यात मासे सापडले की, त्यावर हल्ला करतात. मासे खाऊन पुढे जाताना जाळ्यांचे नुकसान करतात. जाळ्यात सापडलेले मासे निघून जातात आणि जाळी फाडून नुकसानही होते. दुहेरी फटका मच्छीमारांना बसत असल्यामुळे काहींनी मासेमारीला जाणेच थांबवले आहे. गिलनेटला दिवसाला १० ते १५ हजार रुपयांची मासळी मिळाली तरच फायदा होतो अन्यथा नुकसान सहन करावे लागते. त्यामुळे डॉल्फिनचा वावर परिसरात कसा आहे, हे पाहूनच मच्छीमार मासेमारीला रवाना होतात. काळबादेवीतील काही मच्छीमारांना डॉल्फिनचा त्रास सहन करावा लागला आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये मासळी मिळण्याचे प्रमाण कमी झाले होते. त्यामुळे माशांचे दरही वधारलेले आहेत. नेहमी बंपर मिळणारा बांगडा मासा किलोला १५० रुपयांनी विकला गेला. बांगड्याचा दर सर्वसाधारणपणे १२० रुपये किलो असतो, टायनी किलोला १२० तर मोठी कोळंबी २५० रुपये, बोंबिल १८० रुपये किलोने विकला जात आहे.

गेल्या काही वर्षांत डिसेंबर ते जानेवारी या कालावधीत डॉल्फिन मासे काळबादेवी परिसरात आढळत आहेत. मच्छीमारांना मासळी कमी मिळत असल्याने नुकसान सहन करावे लागत आहे. या परिस्थितीत व्यवसाय कसा करायचा हा मोठा प्रश्न आहे. आर्थिक डोलारा सांभाळण्यासाठी पर्यायी व्यवसाय करावा लागत आहे. – श्रीदत्त भुते, मच्छीमार

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:40 PM 24/Jan/2025