रत्नागिरी : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याच्या सूचना प्राप्त झाल्या असून, येत्या काही दिवसांत बदली पोर्टल शिक्षकांसाठी खुले करण्यात येणार आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे वाढणार आहेत. त्याचा फटका विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होत असल्यामुळे आंतरजिल्हा बदली प्रक्रिया कायमस्वरूपी थांबवावी, अशी मागणी रत्नागिरी जिल्ह्यातून वारंवार केली जात आहे.
शासनाने भरती थांबवल्यामुळे २०१० नंतर नव्याने शिक्षक नियुक्त झाले नव्हते. त्यावेळी भरतीसाठी पात्र असलेल्यांमध्ये स्थानिकांचा टक्का कमीच होता. परिणामी, त्यावेळी झालेल्या भरतीत परजिल्ह्यातील शिक्षकांचा टक्का वाढला. गेल्या पंधरा वर्षांत शिक्षक भरतीच झाली नाही; मात्र सेवानिवृत्त आणि आंतरजिल्हा बदल्यांची प्रक्रिया कायमच सुरू होती.
परजिल्ह्यात जाणाऱ्यांची संख्या अधिक आणि तिकडून येणारे शिक्षक हाताच्या बोटावर मोजण्याएवढेच अशी परिस्थिती होती. त्यामुळे रिक्त पदांची संख्या वाढली. २०२३ पर्यंत जिल्हा परिषद प्राथमिक विभागात २ हजार शिक्षक पदे रिक्त होती; मात्र महायुती सरकारने पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरती प्रक्रिया सुरू केली. त्यामधून रत्नागिरी जिल्ह्याला १३०० नवीन शिक्षक मिळाले; परंतु रिक्त पदांची संख्या कमी झाली. ही परिस्थिती असतानाच गतवर्षी ४०० शिक्षक आंतरजिल्हा बदलीने परजिल्ह्यात पाठवण्यात आले. त्यामुळे पुन्हा रिक्त पदांची संख्या १ हजारांवर पोहोचली. त्यावर पर्याय म्हणून शासनाने कंत्राटी स्वरूपात साडेतीनशे शिक्षकांची भरती केली. विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी एकीकडे प्रयत्न सुरू असतानाच शासनस्तरावरून आंतरजिल्हा बदल्या करण्यासाठी बदली पोर्टल सुरू करण्याचे संकेत दिले आहेत. याला जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून दुजोरा मिळाला आहे. मागील पाच वर्षात आंतरजिल्हा बदलीने सुमारे एक हजार शिक्षक परजिल्ह्यात पाठविण्यात आले आहेत. त्या तुलनेत रत्नागिरी जिल्ह्यात आलेल्याची संख्या नगण्यच आहे.
जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची पदे भरलेली नसल्यामुळे आंतरजिल्हा बदली प्रक्रिया राबविणे योग्य नाही. प्रशासनाने आंतरजिल्हा बदल्या केल्या तर ठाकरे शिवसेनेकडून विरोध केला जाईल. संतोष वेराडे, माजी अध्यक्ष, जिल्हा परिषद
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:24 PM 24/Jan/2025














