चिपळूण पंचायत समिती बांगलादेशी महिलेच्या दाखल्याचा अहवाल रत्नागिरी पोलिसांना देणार

चिपळूण : रत्नागिरी येथे सापडलेल्या बांगला देशी महिलेची रत्नागिरी पोलिसांमार्फत चौकशी सुरू आहे. या चौकशीत महिलेचा जन्मदाखला चिपळूण पंचायत समितीमधून दिल्याचे पुढे येत असून, या दाखल्यावर संशयास्पद नोंदी आहेत. त्यामुळे या प्रकरणी चिपळूण पंचायत समिती रत्नागिरी पोलिसांना अहवाल देणार आहे.

रत्नागिरी पोलिसांकडून चिपळूण पंचायत समितीला सनमा खातून बिलाल मुल्ला ऊर्फ सनमा राहील बोंबल यांच्या जन्म दाखल्याची पडताळणी करण्यास कळविले आहे. या प्रकरणी रत्नागिरी पोलिसच चौकशी करीत आहेत. त्यांनी याबाबत चिपळूण पं.स. गटविकास अधिकाऱ्यांकडे माहिती मागविली आहे व जन्मदाखला रजिस्टरवरील नोंदीची प्रत मागितली आहे. त्यानुसार मुल्ला यांचा जन्म सावर्डे येथे १९८४ मध्ये झाल्याची नोंद घालण्यात आली आहे तर त्यांचा पत्ता गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे दाखविला आहे. जन्म दाखला १८ मार्च २०२१ रोजी चिपळूण पं. स.तून दिला आहे. अबिदा बिलाल मुल्ला यांनी ही नोंद केली आहे.

जन्म दाखल्याची पडताळणी होणार…
या दाखल्याची पडताळणी सुरू झाली असून या दाखल्यावर गटविकास अधिकाऱ्यांचा शिक्का देखील आहे. त्यामुळे या दाखल्याबाबत संशय व्यक्त होत आहे. शिवाय दाखल्यावर आवक क्रमांक नसल्याचे पुढे येत आहे. त्यामुळे हा दाखला चिपळूण पं. स. तून देण्यात आला की, परस्पर बनावट आहे, याची चौकशी सुरू आहे. या जन्म दाखल्याची पडताळणी करून या बाबतचा अहवाल रत्नागिरी पोलिसांना पाठविला जाईल, असे गटविकास अधिकारी उमा घारगे-पाटील यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:24 AM 25/Jan/2025

Aayurzil