चिपळूण : ऑस्ट्रेलियातील आधुनिक शेतीमध्ये यांत्रिकीकरण व तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. तसेच कमीत कमी मनुष्यबळात व अधिकाधिक तंत्रज्ञानाचा वापर करून खूप मोठ्या शेतीचे व्यवस्थापन नियोजनबद्धरित्या केले जाते, असे प्रतिपादन ए. जी. मर्चेंड सर्व्हिसेस प्रा. लि., न्यू साउथ वेल्स, ऑस्ट्रेलियाचे सहसंस्थापक ऑलिव्हर मर्चंड यांनी केले. सावर्डेतील कार्यक्रमात ते बोलत होते.
सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी ऑस्ट्रेलियातील आधुनिक शेती व्यवस्थापन व शेतीमधील तंत्रज्ञानाचा वापर या महत्त्वपूर्ण विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी मुख्य व्याख्याते ऑस्ट्रेलियातील ए. जी. मर्चेड सर्व्हिसेसचे सहसंस्थापक ऑलिव्हर मर्चंड सह्याद्री शिक्षण संस्थेचे सचिव महेश महाडिक, सह्याद्री क्रीडा प्रबोधिनीचे अध्यक्ष अनिरुद्ध निकम, विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे, उपप्राचार्य विजय चव्हाण, पर्यवेक्षक उद्धव तोडकर, विद्यालयातील सर्व शिक्षक व ५४५ विद्यार्थी उपस्थित होते.
ऑलिव्हर मर्चंड यांनी ऑस्ट्रेलियातील प्रचंड मोठ्या शेतीमध्ये आधुनिक शेती व्यवस्थापन व तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर कमीत कमी मनुष्यबळात कसा केला जातो हे प्रत्यक्ष चित्रफितीच्या माध्यमातून सांगितले. तेथे वापरली जाणारी आधुनिक व अवजड शेती अवजारे, अद्ययावत फवारणी यंत्रे, विविध प्रकारचे तण नियंत्रण, सेंद्रिय व रासायनिक खतांचा वापर, पिकांचे मूल्यवर्धन, साठवणूक, विक्री, पीक प्रक्रिया उद्योग इत्यादीबद्दल माहिती दिली. यानंतर सह्याद्री क्रीडा प्रबोधिनीचे अध्यक्ष अनिरुद्ध निकम यांनीदेखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व अशा प्रकारच्या आधुनिक शेती व्यवस्थापन व तंत्रज्ञानाचे भविष्यात वापर करण्याचे आवाहन केले. तसेच ऑस्ट्रेलिया येथे शेतीविषयक उच्च शिक्षण घेत असताना आलेल्या अनुभवांचे देखील विद्यार्थ्यांसमोर कथन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीलेशकुमार यादव यांनी केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:08 AM 25/Jan/2025













