इतिहास समजण्यासाठी कीर्तनमाला गरजेची : धनंजय चितळे

चिपळूण : इतिहास समजून घ्यायचा असेल तर कीर्तनमालेसारखे उपक्रम आज गरजेचे आहेत. चिपळूण येथील श्री स्वामी चैतन्य परिवार गेली आठ वर्षे या उपक्रमाच्या माध्यमातून आपली संस्कृती, इतिहास याची ओळख करून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. या प्रयत्नांना सामाजिक जाणिवेतून सर्वांनी अशा उपक्रमांसाठी भरभरून उपस्थिती, सर्वतोपरी सहकार्य करायला हवे, असे प्रतिपादन प्रवचनकार, संत साहित्याचे गाढे अभ्यासक धनंजय चितळे यांनी येथे केले.

श्री स्वामी चैतन्य परिवार आयोजित शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथे ‘शर्थीने राज्य राखिले’ चार दिवसीय कीर्तनमालेच्या शुभारंभ प्रसंगी चितळे बोलत होते. ते म्हणाले, दशावतार ते छत्रपती शंभूराजेपर्यंतचा इतिहास गेल्या आठ वर्षांत विद्यावाचस्पती आफळेबुवा यांनी आपल्या अमोघ वाणीमधून उलगडून दाखविला आहे. यावर्षीच्या चार दिवसीय कीर्तनमालेत १६८९ नंतरचा स्वराज्य राखण्याचीसाठीचा काळ किती संघर्षमय होता, यामध्ये सामान्यांचे असलेले योगदान किती महत्त्वाचे होते. ही ताकदच शर्थीने राज्य राखण्यात मोलाची ठरली. श्री स्वामी चैतन्य परिवाराच्यावतीने यावर्षी शुभारंभपप्रसंगी नारी शक्तीचा सन्मान म्हणून शैलजा जोशी, संजीवनी देवळेकर, नेहा थत्ते, अश्विनी प्रभुलकर, अनुष्का कुलकर्णी यांना व्यासपीठावर बसण्याचा सन्मान देण्यात आला. तसेच विजय परचुरे यांनी यावर्षीही कीर्तनमालेस भरभरुन प्रतिसाद लाभेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.

चार दिवसीय कीर्तनमालेत छत्रपती शंभूराजे यांच्यानंतर स्वराज्याचे विरोधातील बलाढ्य शत्रूविरूद्ध शर्थीने राज्य राखताना छत्रपती राजाराम, ताराराणी, शाहू महाराज, बाळाजी विश्वनाथ पेशवे, बाजीराव पेशवे यांच्या झुंजार कारकीर्दीचा मागोवा आफळेबुवा घेणार आहेत. श्री स्वामी चैतन्य परिवारातर्फे २८ जानेवारी पर्यंत सायंकाळी ६.३० ते रात्री ९.३० या वेळेत कीर्तनमाला आयोजित करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:09 PM 28/Jan/2025