राजापूर : राजापूर शहरातील बाजारपेठेतून जुलै २०२४ मध्ये दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याच्या मुसक्या आवळण्यात राजापूर पोलिसांना यश आले आहे. दिलीप गंगाराम बेंद्रे (रा. कोंड्ये, बेंद्रेवाडी) असे संशयिताचे नाव असून त्याच्याकडून दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या.
राजापूर पोलिसांनी दिलेली माहिती, ८ जुलै, २०२४ रोजी रात्री राजापूर शहराजवळील कोंढेतड गाडगीळवाडी येथील अरविंद लांजेकर यांची दुचाकी राजापूर बाजारपेठेतून चोरीला गेली होती. लांजेकर यांनी याबाबतची माहिती राजापूर पोलिस ठाण्यात दिली. पोलिस उपनिरीक्षक मोबीन शेख सहकाऱ्यांसमवेत कोंड्ये बेंद्रेवाडी येथे दाखल झाले आणि दुचाकीसमवेत संशयित दिलीप बेंद्रे याला ताब्यात घेतले. दारूच्या नशेमध्ये आपण दुचाकी चोरल्याची कबुली दिलीप याने दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. या वेळी संशयित दिलीप याच्याकडे आणखी एक दुचाकी सापडली. सदरची दुचाकी त्याने एप्रिल, २०२४ मध्ये राजापूर एसटी डेपो येथून चोरल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी संशयित दिलीप बेंद्रे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला आज न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:21 AM 29/Jan/2025













