रत्नागिरी : रिळ येथील बागायतदार मकरंद काणे यांच्या बागेतील हापूसच्या दहा पेट्या पुणे-मुंबईत

रत्नागिरी : तालुक्यातील रिळ येथील बागायतदार मकरंद काणे यांच्या बागेतील हापूस आंब्याच्या दहा पेट्या पुणे आणि मुंबई बाजारात पाठवण्यात आल्या आहेत. एक पेटीला २१ हजार रुपये दर मिळाला आहे.

दोन दिवसांपूर्वी रत्नागिरी तालुक्यातील तरुण बागायतदार मकरंद काणे यांच्या बागेतील हापूस आंबा काढणी ३० जानेवारीला करण्यात आली. ५ व ६ डझनच्या पेट्या भरून त्यांची पूजा करण्यात आली. त्यानंतर चार पेठ्या पुणे येथील अडतदार अरविंद मोरे यांच्याकडे पाठविण्यात आल्या. तेथील बाजार समितीच्या फळे व तरकारी विभागाचे प्रमुख बाळासाहेब कोंडे व अडतदार युवराज काची यांच्या हस्ते आंब्याच्या पेटीचे पूजन झाले. पाच डझनांच्या या पेटीला लिलावात सुमारे २१ हजार रुपये दर मिळाला. अडतदार युवराज काची यांनी या आंब्यांच्या पेटीची खरेदी केली. उर्वरित सहा पेट्या मुंबईतील बाजारात पाठविण्यात आल्या आहेत.

रत्नागिरी हापूस आंब्याचा नियमित हंगाम हा मार्चपासून सुरू होतो. त्यावेळी आवक वाढते. तोपर्यंत तुरळक आवक सुरू असते. गतवर्षी फेब्रुवारी महिन्यात मोठ्याप्रमाणात हापूस रत्नागिरीतून रवाना झाला होता. मात्र, यंदा पाऊस लांबल्यामुळे फेब्रुवारीत हापूसचा मुहूर्त होणे अशक्यच मानले जात होते. तरीही मकरंद काणे यांच्या प्रयत्नामुळे हापूसच्या पेट्या या महिन्यात रवाना झाल्या आहेत. पुणे येथे लिलावाप्रसंगी बाजार समिती फळविभाग गटप्रमुख दादा बांदल, आयातदार गणेश यादव, राजू भोले, परेश शहा, नाना लेंडे, सुधीर मनसुख, व्यापारी सीताराम वाडकर, माऊली आवेकर, विठ्ठल माने, फशी बागवान उपस्थित होते.

देवगड येथून हापूसची पहिली पेटी बाजारात दाखल झाल्यानंतर जानेवारी महिन्यात रत्नागिरीतून हापूसची पहिली पेटी रवाना झाली होती. त्यानंतर पुढील पंधरा दिवस रत्नागिरीमधून हापूस बाजारात दाखल झालेला नव्हता.

Infigo eyecare

ऑक्टोबरमध्ये रिळ येथील आंबा बागेतील कलमांना मोहोर आला होता. त्याचे योग्य प्रकारे जतन केले. त्यामुळे दहा पेटी आंबा हाती आला आहे. त्याला दरही चांगला मिळाला. मात्र, यंदाच्या हंगामामध्ये हापूसचे उत्पादन सरासरी राहील. – मकरंद काणे, रिळ

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:31 PM 03/Feb/2025