बांकीपूर उपनिवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या विजयानंतर राहुल गांधी आक्रमक; तरुणांच्या रोजगाराच्या मुद्द्यावरून ८ ऑगस्टला मैदानात उतरणार
Rahul Gandhi Prayagraj Protest संदर्भात राष्ट्रीय राजकारणात नवीन घडामोडी समोर येत आहेत. एकीकडे बिहारमधील बांकीपूर विधानसभा मतदारसंघाच्या उपनिवडणुकीत जन सुराज पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर यांनी भाजपच्या पारंपरिक बालेकिल्ल्यात दणदणीत विजय मिळवून मोठा धक्का दिला असतानाच, दुसरीकडे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी रोजगाराच्या मुद्द्यावरून केंद्र व राज्य सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. ‘जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा’ असा थेट इशारा राहुल गांधी यांनी ट्विटद्वारे दिला आहे.
नुकत्याच झालेल्या दिल्लीतील जंतरमंतर येथील आंदोलनामुळे देशातील विद्यार्थ्यांची आणि तरुणांची मोठी ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. याच विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि रोजगाराच्या प्रलंबित मागण्यांना घेऊन राहुल गांधी आता स्वतः मैदानात उतरणार आहेत. येत्या ८ ऑगस्ट रोजी उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भव्य आंदोलन छेडण्यात येणार असून, यामध्ये देशभरातील तरुणांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
आपल्या सोशल मीडिया संदेशात राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांच्या परिस्थितीवर तीव्र चिंता व्यक्त केली. कोटा आणि देहराडूननंतर आता प्रयागराजमध्ये विद्यार्थ्यांचे आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असे सांगत ते म्हणाले की, “दरवर्षी लाखो तरुण विविध परीक्षांचे अर्ज भरतात, प्रचंड फी भरतात आणि निकालाची वाट पाहत राहतात. परंतु, वारंवार होणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांमुळे त्यांचे अपरिमित नुकसान झाले असून थांबलेल्या भरती प्रक्रियेमुळे त्यांचे भविष्य अंधारात सापडले आहे.”
आपल्या न्याय्य अधिकारांसाठी आवाज उठवणाऱ्या विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि पेलेट गनचा वापर केला, असा आरोप करत राहुल गांधी यांनी या अन्यायाविरोधात काँग्रेस पक्ष सातत्याने आवाज उठवत राहील आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देईल, अशी ग्वाही दिली. “जबाबदारी स्वीकारा किंवा सत्ता सोडा,” असा कडक इशाराही त्यांनी उत्तर प्रदेश आणि केंद्र सरकारला दिला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:38 04-08-2026














