पक्षाच्या घटनेतील दुरुस्तीबाबत आवश्यक कागदपत्रे आणि वैध प्रस्ताव सादर करण्याचे आयोगाचे निर्देश
NCP Election Commission Notice संदर्भात महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून एक अत्यंत महत्त्वाची घडामोडी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांना भारत निवडणूक आयोगाने (ECI) २७ जुलै, २०२६ रोजी पत्र पाठवून पक्षाच्या घटनेतील विविध बदलांसंदर्भात आवश्यक कागदपत्रे आणि अधिकृत प्रस्ताव लवकरात लवकर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. पक्षाच्या घटनेतील बहुतांश बदलांना समर्थन देणारे वैध प्रस्ताव आयोगाला अद्याप प्राप्त झालेले नाहीत, असा स्पष्ट उल्लेख या पत्रात करण्यात आला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर २६ फेब्रुवारी २०२६ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसने राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावून सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी बिनविरोध निवड केली होती. निवडणूक आयोगाच्या सूत्रांनुसार, २६ फेब्रुवारीच्या राष्ट्रीय अधिवेशनातील ठरावामध्ये केवळ घटनेतील कलम १८(१) मधील दुरुस्तीचा अधिकृत उल्लेख आहे. परंतु, पक्षाने याशिवाय कलम ६, ७, १२, ३२ आणि ३६ मध्येही महत्त्वपूर्ण बदल केले असल्याचे समोर आले आहे.
सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाकडे १० मार्च २०२६ आणि ७ एप्रिल २०२६ रोजी पाठवलेल्या पत्रांनुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या घटनेतील कलम ६, ७, १२, १८(i), ३२ आणि ३६ मध्ये दुरुस्ती करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. तथापि, पक्षाकडून आयोगाकडे जमा करण्यात आलेल्या कागदपत्रांच्या संचात केवळ कलम १८(i) शी संबंधित २६ फेब्रुवारी २०२६ च्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या ठरावाचाच समावेश आहे. त्यामुळे उर्वरित कलम ६, ७, १२, ३२ आणि ३६ मधील दुरुस्त्यांना मान्यता देणारे पक्षाचे अधिकृत ठराव आणि संबंधित कागदपत्रे तातडीने सादर करावीत, असे निर्देश आयोगाने दिले आहेत.
या राजकीय घडामोडीची पार्श्वभूमी पाहिली असता, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर अजित पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली होती. २८ जानेवारी रोजी मुंबईहून बारामतीकडे जाणाऱ्या विमानाला बारामती विमानतळाजवळ झालेल्या भीषण अपघातात अजित पवार यांचे निधन झाले. या अकस्मात घडामोडीनंतर पक्षाची धुरा सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवण्यात आली होती. आता निवडणूक आयोगाच्या या तांत्रिक नोटिसीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून कायदेशीर पुरावे आणि आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी काय पावले उचलली जातात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:28 04-08-2026














