संगमेश्वर : मुर्शीत तापाने ५ महिन्याच्या बाळाचा मृत्यू

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील मुर्शी भेंडीचा माळ येथे ५ महिन्याच्या बालकाचा तापाने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना ३१ जानेवारी रोजी घडली. मयुरेश जणू जांगळी असे मृत बालकाचे नाव आहे.

देवरुख पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, मयुरेशला ताप आल्याने उपचारासाठी तत्काळ कुटुंबियांनी साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र मयुरेशची प्रकृती अधिक बिघडल्याने वैद्यकीय सूत्रांनी त्याला जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यास सांगितले. रत्नागिरी येथेही मयुरेशची प्रकृती खालावत चालल्याने डॉक्टरांनी त्याला कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात नेण्यास सांगितले. कोल्हापूर येथे रूग्णवाहिकेतून जात असताना वाटेतच त्याची तब्येत बिघडल्याने रुग्णवाहिका पुन्हा जिल्हा रूग्णालयात आणण्यात आली.

यावेळी वैद्यकीय सूत्रांनी तपासणी करून मयुरेशला मृत घोषित केले. या दुदैवी घटनेमुळे जांगळी कुटुंबियांसह मुर्शी गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या बाबत देवरुख पोलीस ठाण्यात शनिवारी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:23 03-02-2025