हिंदुत्ववादी विचारांची जोड देत संघटन भक्कम करूया : ना. नितेश राणे

रत्नागिरी : रत्नागिरीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना बळ देणे आणि रत्नागिरीत भाजपा पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनविण्यासाठी माझ्यावर पक्षाने संपर्कमंत्री पदाची जबाबदारी दिली आहे. आपण सगळेजण एकत्र काम करूया आणि हिंदुत्ववादी विचारांची जोड देत संघटन भक्कम करूया, असे आवाहन रत्नागिरी जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकत्यांना राज्याचे मत्स्य व्यवसाय तथा बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी केले.

रत्नागिरीच्या संपर्क मंत्री पदाची जबाबदारी भाजपने दिल्यानंतर ना. नितेश राणे यांचा रत्नागिरीत पहिला संपर्क मेळावा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी भाजपाचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष केदार साठे, ज्येष्ठ नेते बाबा परुळेकर, माजी नगराध्यक्ष अशोक मयेकर, मंडळ अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडी उपस्थित होते. रत्नागिरीचे संपर्क मंत्री झाल्याबद्दल भाजपाच्यावतीने ना. नितेश राणे यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना ना. राणे म्हणाले की, रत्नागिरीतील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी मला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी हे पद दिले आहे. माझ्या नजरेसमोर इथे फक्त भाजपा कार्यकर्ता आहे. त्यामुळे आता पक्ष वाढवणं यासाठी मी इथे काम करणार आहे.

खासदार म्हणून नारायण राणे येथे कार्यरत आहेत. रवींद्र चव्हाण हे कार्याध्यक्ष झालेत आणि आता मी भाजपाचा संपर्क मंत्री म्हणून इथे येत राहणार आहे. कार्यकत्याँचा सन्मान हेच माझं ध्येय धोरण असेल. मी संपर्क मंत्री झालो, तो भाजपच्या कार्यकत्यांना बळ देण्यासाठी झालो आहे. त्यांची कामे झाली पाहिजेत, ती होतात का, ते बघण्यासाठी मी संपर्क मंत्री झालो आहे. तुमच्यावर जर अन्याय झाला तर, दुसऱ्या क्षणाला नितेश राणे इथे पोहोचेल, असेही मी प्रशासनाला सांगून ठेवले आहे. त्यामुळे आता ताकदीने कामाला लागा. तुमच्याच विचारांचे खासदार आणि संपर्क मंत्री पक्षाने इथे आपल्याला दिले आहे, असा विश्वास ना. राणे यांनी कार्यकर्त्यांना दिला.

जिल्ह्यात भाजपला एक नंबरवर आणूया
माझ्यासाठी भाजपा, भाजपाचे संघटन हे महत्वाचं आहे. ही हिंदू राष्ट्राची भूमी आहे. त्यामुळे आता एकत्र काम करूया आणि या जिल्ह्यात भाजपा हाच एक नंबरचा पक्ष असेल इतके सक्षम होऊया, असे आवाहन त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांना केले. त्यांच्या या संबोधनाला कार्यकत्यांनी जोरदार प्रतिसाद दिला. ना. राणे यांच्या जयघोष सोबतच जय श्रीराम आणि भारत माता की जय च्या घोषणांनी सभागृह दणाणून गेले होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:53 AM 10/Feb/2025