रत्नागिरी : समुद्रातील अवैध मासेमारीवर नजर ठेपणाऱ्या ड्रोनच्या कॅमे-यात टिपल्या जाणाऱ्या मासेमारी नौकांवर दंडात्मक कारवाई होऊ लागली आहे. मिरकरवाडा बंदर परिसरातील अनधिकृत बांधकामे हटवण्यात आली आहेत. आता याचे परिणाम दिसू लागले आहेत, मार्केटमधील मासळीचे दर वाढू लागले आहेत. यातून अप्रत्यक्षरित्या रत्नागिरी जिल्ह्यातील मासेमारी उद्योग अडचणीत येत असून, खवय्यांच्या खिशालाही मासळी परवडेनाशी झाली आहे. मासेमारी हासुद्धा एक उद्योग असून उद्योगमंत्री असलेल्या पालकमंत्री उदय सामंत यांनी सहानुभूतीपूर्वक लक्ष घालून सहकार्य करण्याची मागणी नौका मालकांकडून होऊ लागली आहे.
अवैध मासेवारीवर लक्ष ठेवण्यासाठी रत्नागिरीतील मिरकरवाडा तसेच साखरीनाटे आणि दाभोळ येथे ड्रोनची गस्त सुरू झाली आहे. पालशेतपासून बोच्यापर्यंतच्या समुद्रात ५ वावपर्यंत समुद्रात मासेमारी करण्याची कायदेशीर मुभा आहे. मात्र रत्नागिरीत १० वाव अंतराच्या आत समुद्रात मासेमारी करणे बेकायदेशीर आहे. परंतु ड्रोनचा कॅमेरा २० वे ३० वावपर्यंतच्या अंतरात मासेमारी करणाऱ्या नौका टिपत असून, अशा नौका मालकांकर दंडात्मक कारवाई केली जात असल्याचा आरोप नौका मालकांकडून होऊ लागला आहे. गेल्या महिनाभरातच रत्नागिरीत अशा १५ नौकांवर मत्स्य व्यवसाय विभागाकडून कारवाई झाली आहे. त्यामुळे अनेक नौका मासेमारीसाठी समुद्रात पाठवल्या जात नाहीत. त्यात गेल्या आठवडयापासून समुद्रात जोरदार वारे वाहत असल्याने मासेमारीला ब्रेक लागला आहे. परिणामी मासळी उत्पादन घटले आहे.
मिरकरवाडा बंदर परिसरातील अनेक अनधिकृत शेड, कावण, कच्ची-पक्की बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. याठिकाणी मासळीचा साठा करून ठेवला जात होता. ग्राहकांना लागेल तशी मासळी तेथून काढून दिली जात होती. परंतु आता बंदरावर मासे ठेवण्यासाठी जागा नसल्याने ती दुसरीकडे ठेवली जात आहे. तेथून ती मासळी बंदरावर आणण्यासाठी वाहतुकीचा खर्च वाढत असल्याने तो वाढीव किमतीचा भार ग्राहकाला सोसावा लागत आहे.
मासळीच्या वाढलेल्या दरामुळे रविवार असतानाही मासळी मार्केटमध्ये शुकशुकाट होता, मासळी मार्केटमधील मच्छी व्यावसायिक महिला मिरकरवाडा बंदरावरुन मासे खरेदी करतात. जी सुरमई महिनाभरापूर्वी ४०० ते ५०० रुपये किलो दराने होती ती आता ७५० रुपये किलोने मिळत होती. सरंगा ३५० रुपयांना मिळत होता त्याचा दर ५०० रुपये किलोवर गेला आहे. जी मोठी पापलेट १५०० रुपये किलोने मिळत होती. आता पापलेटची पिल्लं किंवा छोट्या पापलेटचा दर १५०० रुपये इतका असल्याचे मच्छी विक्री करणाऱ्या महिलांनी सांगितले.
रत्नागिरी जिल्ह्यात सागरी मासेमारी करणाऱ्या ३ हजार १७४ नौका असून, त्यातील २ हजार ५१५ यांत्रिकी नौका आहेत. या नौकांच्या मासेमारीवर शासनाकडून वेगवेगळ्या निर्बंधांसह ड्रोनमुळे मत्स्य व्यवसाय विभागाकडून होणाऱ्या कारवाया वाढल्या आहेत. त्यामुळे कोट्यवधीची गुंतवणूक असलेला हा मासेमारी उद्योग अडचणीत येऊ लागला आहे.
ग्राहकांना मासळी परवडत नाही…
कोलंबी १० बाब समुद्रात मिळते. परंतु ड्रोनच्या भीतीमुळे फिशिंग नौकांना कोळंबी मिळेनाशी झाली आहे. जी कोळंबी १०० रुपये किलो दराने होती तिचा दर २०० रुपये किलो इतका झाला आहे. १०० रुपये किलो दराने मिळणारा बांगडा २०० रुपये तर २०० रुपये दराने मिळणाऱ्या सौंदाळ्यांचा दर ३५० रुपयांवर पोहोचला आहे. ग्राहकाला महाग मासळी घेवून खाणे परवडणारे नाही.
वाऱ्यामुळे मासेमारी करणे कठीण..
सध्या उपरचा (उत्तरेकडून वाहणारा) बारा सुरू आहे. या बातावरणात पाण्याला ‘करंट’ असल्याने समुद्रात मासेमारी करणे कठिण होते. एकीकडे समुद्रात मासा मिळेनासा झाला आहे. त्यात मासेमारीबर अनेक निबंध येऊ लागल्याने हा उद्योगच करणे नौका मालकांना परवडेनासा झाला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:16 PM 10/Feb/2025














