रत्नागिरी : दारू सुटल्याने १५० जणांचे आयुष्य सुधारले

रत्नागिरी : प्रसिद्धीची हाव नाही, नेतृत्वासाठी चेहरा नाही, सभासदांची निश्चित संख्या नाही, येण्यासाठी प्रवेशशुल्क नाही, तरीही रत्नागिरी जिल्ह्यात गेली १५ वर्षे अल्कोहोलिक्स अॅनॉनिमस या संस्थेचे कार्य सुरू आहे. या कार्यकाळात दारूड्या ही एकच ओळख घेऊन आलेल्या हमाल, श्रमजीवीपासून ते वरिष्ठ स्तराच्या अधिकाऱ्यांपर्यंत १५० हून अधिक जणांचे आयुष्य या संस्थेच्या प्रयत्नांमुळे प्रकाशमान झाले.

(ए. ए.) या संस्थेचे राज्यात ३१० समूह क्रियाशील आहेत. २१ वर्षांपूर्वी रत्नागिरी शहरात प्रवेश केलेल्या या संस्थेचे जिल्ह्यात ८ समूह आहेत. या संस्थेत दारूपासून मुक्तता हवी आहे, अशी कोणत्याही जातीधर्माची, कोणत्याही स्तरावर काम करणारी कोणत्याही वयोगटाची व्यक्ती येऊ शकते. सर्वांसाठी विनामूल्य प्रवेश असून कोणाचीही ओळख जाहीर केली जात नाही. प्रत्येक समूहाची आठवडयातून एकदा सभा असते. काही ठिकाणी आठवड्यातून दोन किंवा त्यापेक्षाही जास्त सभा होतात. या सभांमध्ये १२ पायऱ्या-१२ रूढी, अनुभवकथन असे ठरलेल्या कार्यक्रम होतात. यामधून व्यसनाधीन झालेल्या व्यक्तीला त्याची स्वतःची ओळख करून दिली. ठराविक पायऱ्या यशस्वीपणे पार करणाऱ्या व्यक्तीला एक वाटाड्या नियुक्त केला जातो. हा वाटाड्यादेखील पूर्वी व्यसनी असल्याने सहजसंवादातून व्यसन सोडण्यासाठी आलेल्या व्यक्तीला त्याच्या गुणदोषांचे आकलन होते. आजचा दिवस मी दारू पिणार नाही, असा संकल्प दररोज सकाळी करायचा.

या सर्व गोष्टी सहजसाध्य नसतात. व्यसनाधीनतेमध्ये गुरफटल्यानंतर त्या व्यक्तीने स्वतःची शारीरिक, मानसिक, आर्थिक हानी केलेली असते शिवाय कौटुंबिक, सामाजिक मानहानीचाही ती व्यक्ती शिकार झालेली असते; परंतु त्यांच्यासारख्याच प्रवासातून गेलेल्या व्यक्तींच्या अनुभवातून आणि संस्थेतील प्रशिक्षणातून हा बदल हळूवार घडत जातो. व्यसन सोडल्यानंतर नोकरी, व्यवसाय, सामाजिक जीवन, कौटुंबिक जीवनात प्रतिष्ठा, आदर सत्कार प्राप्त केलेल्या, आपल्या क्षेत्रात पुढे गेलेल्या व्यक्ती आजही आमच्यासोबत राहून समाजातील व्यसनाधीनता कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:49 PM 10/Feb/2025