संगमेश्वर : माखजन-मावळंगे रस्ता बनलाय खडतर

माखजन : संगमेश्वर तालुक्यातील माखजन ते मावळंगे हा दोन किलोमीटरचा रस्ता डांबरीकरणाचे काम शासनाच्या बजेटमधून मंजूर असून, गेल्यावर्षी मे २०२४ अखेरीस सदर रस्त्यावर खडी पसरून व त्यावर मलमा करून रोलिंग न करतात ठेकेदार गायब झाला. यामुळे या रस्त्यावर गंभीर परिस्थिती ओढवली आहे. सगळी खडी वर येऊन रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे.

या रस्त्यावरील खडीमुळे वाहने चालवणे सोडाच चालणे देखील मुश्किल झाले आहे. संबंधित बांधकामचे अधिकारी व ठेकेदार यांच्या मनमानी व बेजबाबदारपणाचा नाहक त्रास मावळंगे ग्रामस्थांना गेली आठ महिने सहन करावा लागत आहे. असा आरोप बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष सुरेश भायजे यांनी केला आहे.

बाजारपेठ, वैद्यकीय सोयी, हायस्कूल जुनियर कॉलेज माखजनला असल्याने मावळंगे ग्रामस्थांना येथे यावे लागते. मावळंगे ते माखजन हा दोन किलोमीटर चा रस्ता खराब असल्यामुळे आजारी माणसाला माखजनला प्राथमिक आरोग्य केंद्र वा अन्य डॉक्टरकडे यायच झाले तर मावळंगे ते तुरळ ते आरवली ते माखजन असा २८ किलोमीटरचा प्रवास करावा लागत आहे. डांबरी रस्ता नको, पूर्वीचा मातीचा होता तो बरा होता, असे म्हणण्याची वेळ आता ग्रामस्थांवर आली आहे. पंधरा दिवसात या रस्त्याचे डांबरीकरण झाले नाही तर आंदोलन छेडणार असल्याचे सुरेश भायजे यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:03 AM 18/Feb/2025