चिपळुणातील २५३ वाड्यांमध्ये पाणीटंचाईची शक्यता

चिपळूण : तालुक्यातील अनेक गावातील पाणीयोजना पूर्णत्वास गेलेल्या नाहीत. परिणामी, गावची पाणीटंचाईची दाहकता वाढण्याची शक्यता आहे. तालुक्यात सुमारे ५४ गावातील २५३ वाड्यांमध्ये पाणीटंचाईचा सामना करावा लागणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या उन्हाची दाहकता वाढल्यास सुरवात झाली असली तरी अद्यापही गावाने टँकर सुरु करण्याची मागणी केलेली नाही.

येथील पंचायत समितीच्यावतीने दरवर्षी पाणीटंचाईचा आराखडा केला जातो. आमदार शेखर निकम यांनी तालुक्यातील ग्रामपंचायतींचे सरपंच व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची बैठक घेत टंचाईची माहिती घेतली होती. ज्या गावात संभाव्य पाणीटंचाई जाणवू शकते अशा गावांना प्रस्ताव करण्याची सूचना केली होती. त्यानुसार तालुक्यातील नारदखेरकी, अडरे, मांडवखरी, कळकवणे, कोसंबी, टेरव, तळसर, ओमळी, कुटरे, नांदवसे, मिरजोळी, सावर्डे, वीर, गांग्रई करंबवणे, पाचाड कोंडमळा आदी गावांनी पाणीटंचाईसाठीचे प्रस्ताव दिले आहेत.

तालुक्याच्या टोकास असलेले दसपटीतील तिवरे धरण फुटल्यानंतर अद्याप त्याची दुरुस्ती झालेली नाही, या धरणाच्या उभारणीसाठी कोट्यवधीचा निधी मंजूर झाला, मात्र अद्याप धरणाची उभारणी न झाल्याने दसपटीतील गावांना पाणीटंचाईची झळ बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे तसेच कळवंडे धरण दुरुस्तीचे काम सुरू असल्याने धरणात पाणीसाठा अत्यल्प आहे. त्यामुळे धरणाखालील गावांनादेखील टंचाईची झळ बसण्याची शक्यता असल्याने त्यांनी टँकरची मागणी प्रस्तावित केली आहे.

तालुक्यातील अनेक गावांनी टँकरची मागणी केली असली तरी प्रत्यक्षात प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून संयुक्त पाहणी झाल्यानंतरच मागणी आलेल्या गावात टँकर सुरू केले जाणार आहेत. यावर्षीच्या पाणीटंचाई आराखडयास जिल्हा अधिकाऱ्यांकडून मान्यता मिळाल्यानंतर निधी उपलब्धतेनुसार टंचाईची कामे केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

२९ वाड्यांची नवीन विंधन विहिरींची मागणी
तालुक्यातील ११ गावांतील २९ गावांनी नवीन विंधन विहिरीची मागणी केली आहे. ३ वाड्यांनी विंधन विहीर दुरुस्तीची मागणी केली आहे. त्याचबरोबर १६ गावांतील २४ वाड्यांमध्ये नळपाणी योजना दुरुस्तीची मागणी केली आहे. याशिवाय ८ गावातील ९ वाड्यांनी विहिरीतील गाळ काढण्याची मागणी केली आहे. त्यासाठी ८२ हजाराचा खर्च प्रस्तावित आहे. यावर्षी खासगी विहिरी अधिग्रहण करणे प्रस्तावित केलेले नाही; मात्र पाणीटंचाईची दाहकता अचानक वाढल्यास प्रशासनाकडून खासगी विहिरी अधिग्रहित होऊ शकतात.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:32 AM 18/Feb/2025