चिपळूण : ग्रॅव्हिटी पाणी योजनेतील प्रथम पाईपलाईनचे काम करूनच साठवण टाक्या बांधण्याची मागणी

चिपळूण : चिपळूण शहराला ग्रॅव्हिटी पाणी योजना मंजूर झाली आहे. दरम्यान, नगर परिषदेने काही कामे तातडीने सुरू केली आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने काही ठिकाणी साठवण टाक्यांचे काम हाती घेण्यात आले आहे. परंतु साठवण टाक्या तयार करण्यापूर्वी न.प.ने कोळकेवाडी ते चिपळूण दरम्यान पाईपलाईनचे काम प्रथम सुरू करावे, अशा स्वरूपाची मागणी केल्याची माहिती भाजपचे माजी नगरसेवक विजय चितळे यांनी १७ रोजी पत्रकार परिषदेत दिली.

या बाबत चितळे यांनी सांगितले की, शहराला कोळकेवाडी धरणाच्या माध्यमातून ग्रॅव्हिटी पाणी योजना मिळावी यासाठी गेली अनेक वर्षे प्रयत्न सुरू केले होते. या योजनेचे सर्व प्रकल्प प्रस्ताव अंतिम टप्प्यात होते. ते परिपूर्ण झाल्यावर शासनाने योजनेला सुमारे १६५ कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे.

त्यामध्ये प्रामुख्याने साठवण टाक्यांचे काम सुरू झाल्याची माहिती मिळत आहे. मात्र, हे काम सुरू करण्यापूर्वी न.प.ने प्रथम कोळकेवाडी ते चिपळूण दरम्यान पाण्याची पाईपलाईन टाकून घेणे महत्वाचे आहे. हे पाईपलाईनचे काम प्रथम सुरू व्हावे. जेणेकरुन या माध्यमातून येणारे पाणी जुन्या साठवण टाकीपर्यंत येईल व सुमारे पावणेदोन कोटी रूपये वीज खर्चात बचत होईल, दरम्यानच्या काळात ग्रॅव्हिटी पाणी योजनेअंतर्गत येणाऱ्या पाण्याचा अंदाज येऊन त्यातील तांत्रिक अडचणी देखील दूर करता येतील, तर साठवण टाक्या आधीच बांधल्या गेल्यामुळे त्या टाक्या भरेपर्यंत पाणी योजनेच्या कालावधीत टाक्या कोरड्या राहून त्या निकामी होण्याची शक्यता आहे.

टाक्यांना तडे जाण्याची शक्यता आहे. टाक्या बांधून झाल्यावर पाईप टाकताना हरकती किंवा आडकाठी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाईप टाकण्याचे काम बंद होऊ शकते. तसेच न्यायालयीन वाद निर्माण होऊ शकतात. त्यामुळे प्रथम कोळकेवाडी-चिपळूण पाईपलाईनचे काम हाती घ्यावे व ते जुन्या साठवण टाक्यांपर्यंत आणावे, त्यानंतरच फिल्टरेशन प्लान्ट व नवीन टाक्यांचे काम सुरू करावे. या काळात ठेकेदाराची बिले काढू नयेत, अशी मागणी मुख्याधिकाऱ्यांकडे केल्याची माहिती चितळे यांनी दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:24 PM 18/Feb/2025