दापोलीतील दोन हजार रुपयांच्या ‘त्या’ नोटा आधीच होत्या की नंतर आणून ठेवल्या?

दापोली : दापोली विधानसभा २०१९ च्या निवडणुकीतील उमेदवार अनामत रक्कम तब्बल पाच वर्षांनंतर बँकेत जमा केली गेली. या रकमेत दोन हजारांच्या नोटा होत्या. मात्र, या नोटा आधी होत्या की, नंतर आणून ठेवल्या, अशी चर्चा दापोली तालुक्यात सुरू आहे.

माहिती अधिकारी कार्यकर्ते यांनी ही माहिती मागविल्यानंतर दापोली प्रांत कार्यालय जागे झाले आणि दोन टप्प्यांमध्ये ही रक्कम बँकेत जमा करण्यात आली. एका पेटीत एका लिफाफ्यात ही रक्कम ८५ हजार रुपये आढळून आली होती, असे म्हणणे कार्यालयाकडून आले होते. या रकमेत २ हजार रुपयांच्या १८ नोटाही होत्या. मात्र, या नोटांबाबत आता दापोली तालुक्यात वेगवेगळी चर्चा सुरू आहे.

शासनाचा दस्त हा पाच हजार इतका झाला की, शासन दरबारी जमा केला जातो. या कामात कसूर केली म्हणून दापोलीत दोन तलाठी निलंबित झाले होते. मग शासनाची ८५ हजार इतकी रक्कम कार्यालयात पडून असताना पाच वर्षात उपविभागीय अधिकारी कार्यालयाला याचा हिशेब लागला नाही का, असा ही सवाल या नंतर उपस्थित होत आहे तर शासन या बाबत कुणाला पाठीशी घालत आहे, असेही आता या घटनेच्या पार्श्वभूमीवर बोलले जात आहे.

शासनाकडून निवडणूक काळात निवडणुकीचे कामकाज पाहण्यासाठी येथील कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, या कर्मचाऱ्याने कार्यालयीन कामकाजात कसूर केली असे दिसत आहे. त्यामुळे हा कर्मचारी कोण? आणि निवडणूक अधिकारी या बाबत कारवाई करतील का, असा सवाल दापोलीत उपस्थित केला जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:20 PM 18/Feb/2025