पावस : प्लास्टिकमुक्तीसाठी येथील गणेशगुळे व गावखडी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून समुद्रकिनाऱ्यावर श्रमदान मोहिमेद्वारे स्वच्छता करण्यात आली. त्यामुळे भरतीच्यावेळी किनाऱ्यावर आलेला सगळा कचरा साफ केला गेला. त्यामुळे दोन्ही किनारे चकाचक झाले.
गणेशगुळे सरपंच श्रावणी रांगणकर, उपसरपंच प्रसाद तोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशगुळे समुद्रकिनाऱ्यावर विद्यार्थी, ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य, बचत गटाच्या महिला, पोलिसपाटील, ग्रामसेवक आदी या मोहिमेत सहभागी झालेले होते. यावेळी किनाऱ्यावर साचलेला प्लास्टिक कचरा जमा करण्यात आला आणि त्याची विल्हेवाटही लावण्यात आली. याप्रसंगी उपसरपंच प्रसाद तोडणकर यांनी प्लास्टिक मुक्त श्रमदानाचे महत्त्व पटवून दिले. ते म्हणाले, प्लास्टिकपासून होणारे प्रदूषण टाळण्यासाठी प्रत्येकाने हातभार लावला पाहिजे, प्लास्टिक मुक्तीचा संदेश घराघरापर्यंत पोहोचवण्यात प्रत्येकाने मदत केली पाहिजे. तरच ही मोहीम यशस्वी होईल. सध्या पर्यटकांनी किनाऱ्यावर टाकलेले प्लास्टिक जमा करून त्याची विल्हेवाट या मोहिमेअंतर्गत लावली आहे. येथे येणाऱ्या पर्यटकांना प्लास्टिक मुक्तीचे महत्त्व पटावे यासाठी ही मोहीम महत्त्वाची आहे.
दरम्यान, रत्नागिरी तालुक्यातील गावखडी समुद्रकिनाऱ्यावर ग्रामपंचायत आणि पंचायत समितीच्या संयुक्त विद्यमाने सरपंच गौतम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. यावेळी बचत गटातील महिला, ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी शिक्षिका उपस्थित होत्या. ही मोहिम जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानुसार हाती घेण्यात आली होती.
पर्यटकांचे प्रबोधन
गणेशगुळे व गावखडी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्लास्टिक मुक्तीसाठी समुद्रकिनाऱ्यावर श्रमदान मोहीम राबविण्यात आली. पर्यटकांना प्लास्टिक मुक्तीचे महत्त्व समजावे, या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात आली. किनाऱ्यावरील प्लास्टिकसह अन्य कचरा संलतित करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. त्यामुळे किनाऱ्याचा परिसर चकाचक झाला आहे. प्लास्टिक मुक्तीबाबत पर्यटकांचे प्रबोधनही करण्यात आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:08 PM 18/Feb/2025














