संगमेश्वर : भविष्यात कोकणातील शेतकऱ्यांनी फणस व कोकम या पिकांची व्यापारी दृष्टिकोनातून लागवड करावी, असे आवाहन दापोली कोकण कृषी विद्यापिठाचे कुलसचिव प्रदीप हळदवणेकर यांनी केले. संगमेश्वर तालुक्यातील किरदाड येथे झालेल्या ‘मसालापिके उत्पादन तंत्रज्ञान व प्रक्रिया’ या विषयावरील एक दिवसीय तालुकास्तरीय प्रशिक्षणात ते बोलत होते. हा कार्यक्रम डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठांतर्गत उद्यानविद्या महाविद्यालय दापोलीतील एकात्मिक फलोत्पादन विकास योजना आणि कृषी महाविद्यालय, दापोलो कृषी विस्तार शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला होता.
या वेळी हेमंत तांबे, डॉ. जगदीश कदम, सहयोगी प्राध्यापक डॉ. नितेश दळवी, सहाय्यक प्राध्यापक डॉ. परेश पोटफोडे, डॉ. किरण शिगवण, डॉ. प्रवीण झगडे, रोशन वराहकर, गोविंद चाळके, प्रगतशील शेतकरी वैभव पेडणेकर, ज्ञानदेव माने आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे औचित्य साधून कोकणातील विविध मसालापिकांचे नमुने प्रदर्शनात ठेवण्यात आले होते. या तालुकास्तरीय प्रशिक्षणात डॉ. प्रदीप हळदवणेकर यांनी दालचिनी, काळीमिरी या पिकांची सविस्तर माहिती दिली तसेच भविष्यात शेतकऱ्यांनी फणस व कोकम या पिकांची व्यापारी दृष्टिकोनातून लागवड करावी, असे आवाहन केले.
डॉ. जगदीश कदम यांनी प्रशिक्षणाकरिता आलेल्या शेतकऱ्यांना मसालापिके तंत्रज्ञान प्रशिक्षणाचा योग्यप्रकारे फायदा घेऊन कोकणात मसालापिकांचे क्षेत्र वाढवून उत्पत्र घ्यावे, असे मार्गदर्शन केले.
तसेच कोकम, हळद, आले, जायफळ इत्यादी मसालापिकांच्या लागवडीची माहिती दिली. या प्रसंगी हळद, काळीमिरी, दालचिनी यांची काढणीपश्चात प्रक्रिया जायफळ, कोकम, दालचिनी कलमे बांधणी प्रात्यक्षिक माळी संदीप कांगणे यांनी प्रशिक्षणाचींना करून दाखवली.
या वेळी शेतकरी सुहास चाळके, नारळ मित्र चेतन नाईक व बांबू मित्र महेंद्र यांनी या प्रशिक्षणामुळे आम्हाला मसालापिकांच्या लागवडीबाबत बारकावे समजले व काढणीनंतरचे तंत्रज्ञान अवगत झाले, असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन विस्तार शिक्षण विभागाचे कनिष्ठ संशोधन सहाय्यक डॉ. प्रवीण झगडे यांनी केले. या वेळी सर्व प्रशिक्षणार्थीना प्रमाणपत्र व काळीमिरीची रोपे देऊन गौरवण्यात आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:52 PM 19/Feb/2025














