डेरवणमधील क्रीडा स्पर्धेत भोम उपकेंद्र विजयी

सावर्डे : रविवार दि. १६ फेब्रुवारी रोजी ज्ञान प्रबोधिनी क्रीडा संकूल व टाटा ट्रस्ट आयोजित ग्रामीण खेळाडू विकसन प्रकल्पाच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा सन २०२४-२५ एसव्हीजेसीटी क्रीडा संकुल डेरवण येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धामध्ये सर्वाधिक खेळामध्ये विजयी ठरणाऱ्या उपकेंद्राला सर्वोत्कृष्ट उपकेंद्र २०२४-२५ हे देण्यात येणार होते. या किताबासाठी आकले व भोम या उपकेंद्रांमध्ये स्पर्धेची चुरस रंगली. यामध्ये भोम उपकेंद्र सर्वोत्कृष्ट ठरले.

ग्रामीण खेळाडू विकसन प्रकल्पामधील महाराष्ट्रातील एकूण चार केंद्रांपैकी एक महत्त्वाचे केंद्र असलेल्या चिपळूण केंद्र अंतर्गत न्यू इंग्लिश स्कूल सती-चिंचघरी, महादेवराव शिर्के माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय भोम, मोहन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आकले, न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज आंबडस, आर. सी. काळे विद्यालय पेडे या पाच शाळांमध्ये या प्रकल्पाची उपकेंद्रे गेले वर्षभर सातत्यपूर्वक सुरू आहेत. या पाचही उपकेंद्रांमधील एकूण १९५ खेळाडूंनी एसव्हीजेसीटी क्रीडा संकुल डेरवण या ठिकाणी झालेल्या स्पर्धांमध्ये आपापल्या उपकेंद्राचे प्रतिनिधित्व केले.

या स्पर्धेच्या माध्यमातून काही गुणवंत खेळाडूंची निवड करून त्या खेळाडूंना चिपळूण केंद्राच्यावतीने निगडी येथे होणाऱ्या केंद्रीय स्पर्धांमध्ये चिपळूण केंद्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे. या केंद्रीय स्पर्धामध्ये चिपळूण केंद्रासोबत बारामती, हराळी, मावळ असे एकूण चार केंद्र स्पर्धेच्या माध्यमातून समोरासमोर येणार आहेत.

या प्रसंगी खो-खोचे राष्ट्रीय प्रशिक्षक डॉ. आनंद लुंकड यांनी श्रीफळ वाढवून स्पर्धेची सुरुवात केली. तसेच या प्रकल्पाचे मॅनेजर संकल्प थोरात, स्पोर्ट सायकॉलॉजिस्ट अश्वगंधा पारडे, चिपळूण केंद्र क्रीडा संकुल प्रकल्प समन्वयक तुषार कदम व सहाय्यक केंद्र क्रीडा प्रशिक्षक विशाल सुर्वे हे उपस्थित होते. तसेच गणेश सावर्डेकर, सतीश सावर्डेकर, अमोल सुर्वे, देवराज गरगटे आणि ज्ञान प्रबोधिनी चिपळूणचे सदस्य माधव मुसळे व डॉ. सौ. स्वाती मुसळे यांनी उपस्थित राहून खेळाडूंचा उत्साह वाढवला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:03 PM 19/Feb/2025