SSC exam 2025: दहावीचा पेपर फुटला नाही? शिक्षण मंडळाने दिले स्पष्टीकरण

पुणे : दहावी परीक्षेतील मराठी प्रथम भाषा विषयाची प्रश्नपत्रिका फुटलेली नसून, गैरमार्ग करण्याच्या दृष्टीने प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न व उत्तरे व्हायरल केल्याचे दिसून आले आहे. संबंधित घटनेची गांभीर्याने नोंद घेत जिल्हा प्रशासन याबाबत चौकशी करून त्याचा सविस्तर अहवाल देईल आणि दोषी व्यक्तींवर फौजदारी गुन्हा दाखल करेल.

तशा सूचना देण्यात आल्या आहेत, असे स्पष्टीकरण राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी दिले आहे.

बदनापूर (जि. जालना) येथील परीक्षा केंद्रावर मराठी प्रथम भाषेचा पेपर फुटला असल्याची आणि यवतमाळ जिल्ह्यातील महागाव व कोठारी या परीक्षा केंद्रावर मराठी भाषा विषयाची प्रश्नपत्रिका मोबाईलद्वारे व्हायरल झाल्याची चर्चा पसरली. त्यानंतर सदर केंद्रांवर भेट देत मराठी (प्रथम भाषा) विषयाच्या मूळ प्रश्नपत्रिकेची छाननी करण्यात आली. त्यात प्रसिद्ध झालेली दोन पाने मूळ प्रश्नपत्रिकेची नसून, अन्य खासगी प्रकाशकाने प्रकाशित केलेली दिसून आली. तसेच काही हस्तलिखिते आढळून आलेली आहेत. त्यामध्ये प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न व त्या प्रश्नांची उत्तरे हस्तलिखित आढळून आलेली आहेत, असेही मंडळाकडून सांगण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:51 22-02-2025