राजापूर : ग्रामीण भागात शंभर वर्षापर्वी ज्ञानदानाचे पवित्र कार्य सुरू करून गावच्या शैक्षणिक प्रगतीसाठी केलेले काम आणि त्या काळातील अनेक शिक्षणप्रेमींनी दिलेले योगदान हे गौरवास्पद आहे. त्यामुळे भविष्यात रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली आजिवली येथील सामाजिक व शैक्षणिक विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही राज्याचे बंदर व मत्स्य विकासमंत्री ना. नितेश राणे यांनी आजिवली ग्रामस्थांना दिली.
राजापूर तालुक्यातील जिल्हा परिषद पुर्ण प्राथमिक शाळा आजिवली नं. १ च्या शताब्दी महोत्सव समारंभप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ना. राणे बोलत होते. याप्रसंगी शताब्दी महोत्सवाचा शुभारंभ गावातील प्रतिष्ठीत ग्रामस्थ रामदास मोरे यांच्याहस्ते करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर आजिवली ग्रामपंचायतीचे सरपंच संजय राणे, शताब्दी महोत्सव समिती अध्यक्ष सिताराम राणे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सचिन राणे, पोलीस पाटील उज्वला राणे, तंटामुक्ती अध्यक्ष विलास सुर्वे, केंद्र प्रमुख संदीप परटवलकर, मुख्याध्यापक सुनिल काटे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी ना. राणे म्हणाले, आजिवली गावातील ग्रामस्थांनी १०० वर्षापुर्वी सुरू केलेल्या या ज्ञानदानाच्या कार्यामुळे समाजात शैक्षणिक प्रगती झाली आहे. शताब्दी महोत्सव साजरा होत आहे.
सर्वसामान्यांच्या मुलांना गावात चांगले शिक्षण घेता आले व येत आहे. अनेक पिढ्या यामुळे घडल्या आहेत. ही अभिमानाची व गौरवाची बाब असल्याचे त्यांनी नमुद केले. आपण लोकसभा निवडणूक काळात महायुतीचे उमेदवार आपले खासदार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी या गावात व परिसरात आलो होतो. त्यावेळी तुम्ही तुमच्या हकाचा खासदार राणे यांच्या रूपाने निवडून द्या, विकासाचे आमच्यावर सोडा असा शब्द दिला होता. तुम्ही ९० टक्के मतदान करून खासदार राणे यांना निवडून दिले आहे. त्यामुळे आता या गावातील विकासाची चिंता करू नका. खा. राणे यांच्या मार्गदर्शनाखाली या गावातील व परिसरातील विकासाचा बॅकलॉग भरून काढला जाईल, अशी ग्वाही ना. राणे यांनी यावेळी दिली.
तर आपण रत्नागिरी जिल्ह्याचा संपर्क मंत्री आहे त्यामुळे काळजी करू नका तुमची कामे पुर्ण होणार, येणारा निधी कसा १०० टक्के खर्च होईल, यासाठी पाठपुरावा करा, असे आवाहनही ना. राणे यांनी यावेळी केले.
याप्रसंगी सरपंच संजय राणे यांनी आजिवली गावातील प्रलंबित विविध विकास कामांबाबत माहिती दिली. तर अरूणा प्रकल्पाच्या माध्यमातून येणारे पाणी या भागाला मिळावे, अशी विनंती केली. यावर विकासाच्या सर्व कामांना प्राधान्य दिले जाईल आणि आपल्या सर्व मागण्या पूर्ण केल्या जातील, अशी ग्वाही नाम. राणे यांनी यावेळी दिली.
याप्रसंगी भाजपा तालुका अध्यक्ष भास्कर सुतार, मोहन घुमे, विवेक गुरव, महेश मयेकर, चंद्रकांत लिंगायत, बाजी विश्वासराव आदींसह आजिवली व परिसरातील ग्रामस्थ, शिक्षक, माजी विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी माजी शिक्षक, ७० वर्षावरिल माजी विद्यार्थी यांचा सन्मान करण्यात आला. तर ना. राणे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला राजापूरचे आमदार किरण सामंत यांनीही भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:37 AM 24/Feb/2025














