प्रत्येकास साक्षर करणे हे आपले कर्तव्य : विनोदकुमार शिंदे

साडवली : प्रत्येकाला साक्षर करणे हे आपले कर्तव्य असून देशाच्या प्रगतीसाठी साक्षरता अभियान गरजेचे आहे. या अभियानातून अक्षरांची ओळख होऊन नवसाक्षरांचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल आणि त्यांचे जीवन यशस्वी होईल, असे प्रतिपादन संगमेश्वर पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी विनोदकुमार शिंदे यांनी केले.

संगमेश्वर तालुकास्तरीय उल्लास नवभारत साक्षरता मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी शिक्षणविस्तार अधिकारी तानाजी नाईक, शशिकांत त्रिभुवणे, अभिमन्यू शिंदे, सुनील करंबळे आदी उपस्थित होते. शिंदे म्हणाले, नवभारत साक्षरतेवर आधारित विविध मुद्द्यांवर सखोल मार्गदर्शन करताना नवभारत साक्षरतेचे महत्त्व, मेळाव्याचा हेतू स्पष्ट करून सांगताना अक्षर व अंकओळख तसेच त्यांना विविध उपक्रमांतील साध्या साध्या क्लृप्त्या वापरून व साक्षरांना सहजपणे समजेल अशा पद्धतीने समजावून द्या. नवसाक्षरांसाठी अक्षर अंकलेखन, वाचन परिपूर्ण घेऊन मदत करा, असे आवाहन केले.

शाळा देवरूख नं. २ येथे हा मेळावा झाला. या निमित्ताने शैक्षणिक साहित्याचे अनेक स्टॉल उभारण्यात आले होते. त्यामध्ये जुने पारंपरिक खेळ व आत्ताचे अलीकडील नवीन खेळ उदा. करवंटीची लगोरी व आत्ताची खेळातील रंगीत लगोरी, पूर्वीची चेंडू व फळी आणि आत्ताचे क्रिकेट, अशा प्रकारचे खेळ सांगून नवसाक्षरांना सहज समजेल असे स्टॉल लावले होते. तसेच वाराची कुंडी, अंकाची कुंडी, आपले शेजारी, नातेसंबंध, आपले कुटुंब, घड्याळ, कालमापन, फळांची, फुलांची नावे, वाचनपाटी, स्वच्छता संदेश, नोटांची ओळख, अंकवाचन, अक्षरवाचन, वेळेची बचत इत्यादीवर आधारित शैक्षणिक साहित्याचे ४० स्टॉल शिक्षकाने उभारले होते. या प्रत्येक स्टॉलला मान्यवरांनी भेटी देऊन शैक्षणिक साहित्याची ओळख, वापर, समजण्यासाठी उपयुक्तता जाणून घेतली.

साक्षरतेबाबत जनजागृती
उल्लास मेळाव्यात नवसाक्षरांना वर्गावर्गातून शासनाला अभिप्रेत असलेली साक्षरता पूर्णत्वास नेण्याची प्रतिज्ञा मेळाव्याला उपस्थित असणाऱ्या शिक्षकांनी केली. नवसाक्षरतेवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. गाणी, संवाद, नाटक सादर करण्यात आले. या कार्यक्रमातून साक्षरतेबाबत जनजागृतीचा संदेश दिला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:29 PM 24/Feb/2025