राजापूर : जमावबंदी आदेश झुगारल्याप्रकरणी ५० ते ६० जणांवर गुन्हे दाखल

राजापूर : शहरात मच्छीमार्केट लगत असलेल्या वास्तुत उरूस साजरा करण्यासाठी मागण्यात आलेली परवानगी जमावबंदी आदेश असल्याने राजापूर पोलिसांनी नाकारली. मात्र, जमावबंदी आदेश लागू असतानाही या ठिकाणी बुधवारी १९ फेब्रुवारी रोजी उरूस साजरा केल्याप्रकरणी राजापूर पोलिसांनी ५० ते ६० जणांवर गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत केडगे यांनी पत्रकारांना दिली आहे.

या प्रकरणी परवनागीसाठी ज्यांनी अर्ज केला होता, ते अल्ताफ कासम बारगीर रा. बाजारेपठ राजापूर, यांनी परवानगीसाठी अर्ज केला केला होता. दरम्यान, या प्रकरणी सुमारे ५० ते ६० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे केडगे यांनी सांगितले. या प्रकरणी राजापूर पोलिस स्थानकातील पोलीस शिपाई अनिल लक्ष्मण केसकर यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मच्छीमार्केट लगत असलेली ऐतिहासिक वास्तू हे पुरातन सुर्य मंदिर असल्याचे नमूद करत या ठिकाणी मुस्लिम समाजातील काही व्यक्तींनी अतिक्रमण केले आहे, १९ फेब्रुवारी रोजी या ठिकाणी उरूस कार्यक्रम करणार आहेत, त्याला प्रतिबंद करावा, अशी मागणी हिंदू समाजाच्या वतीने एका लेखी निवेदनाद्वारे बुधवारी राजापूर पोलिसांकडे करण्यात आली होती.

दरम्यान, अल्ताफ कासम बारगीर या ठिकाणी उरूस साजरा करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडे परवानगी मागितली होती. मात्र, प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आलेला असल्याने आपणाला उरूस साजरा करण्यास परवानगी देता येणार नाही, असे नमूद करत राजापूर पोलिसांनी बारगिर यांना उरूस साजरा करण्यास परवानगी नाकारली होती व तसे पत्र दिले होते, असेही केडगे यांनी सांगितले.

दरम्यान, पोलिसांनी परवानगी नाकारलेली असतानाही व जमावबंदी आदेश असतानाही संबंधितांकडून या ठिकाणी उरूस साजरा करण्यात आला व जेवणही ठेवण्यात आले होते. या प्रकरणी ५० ते ६० जणांनी या आदेशाचा भंग करून उरूस साजरा केला, असे केसरकर यांच्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या फिर्यादीवरून राजापूर पोलिसांनी काही जणांवर मनाई आदेशाचे उल्लघंन केले म्हणून त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केल्याचे केडगे यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:42 PM 24/Feb/2025