लांजा : वेरवली बुद्रुक ग्रामस्थांची तहान भागली…

लांजा : करोडो रुपये खर्च करून जवळपास चाळीस वर्षांचा कालावधी लोटला तरी वेरवली बेडेवाडी धरण प्रकल्पाचे पाणी अद्यापही गावाला मिळाले नाही. ‘धरण उशाला आणि कोरड घशाला’, अशीच परिस्थिती वेरवली ग्रामस्थांची झाली असतानाच लांजा-राजापूर-साखरपा आमदार किरण सामंत यांनी ग्रामस्थांच्या पाणी प्रश्नाबाबत लक्ष देऊन बेरवली गावाला तत्काळ पाणी सोडा, अशा सक्त सूचना लघुपाटबंधारे विभागाला दिल्या. त्यामुळे वेरवली बुद्रुक गावाला पाणी सोडण्यात आले आहे.

लांजा तालुक्यातील वेरवली बुद्रुक बेर्डेवाडी हे लघुपाटबंधारे प्रकल्पांतर्गत ६०८.५० मीटर लांबीचे तर ५५.३६ मीटर उंचीचे धरण बांधण्यात आले आहे. या धरणामध्ये २१.६८ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा साठवण्यात येतो आहे. यासह धरणातून उजवा व डावा कालवा काढण्यात आले आहेत. या धरण प्रकल्पाच्या माध्यमातून वेरवली बुद्रुक परिसरातील १०८१ हेक्टर क्षेत्र जमीन सिंचनाखाली आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सन १९८३ सालापासून वेरवली बेर्डेवाडी धरणाच्या कामाला सुरुवात झाली.

धरणाच्या कामाला सुरुवात होऊन काम ४० वर्षांनी पूर्ण झाले आहे. या कालावधीत बेरवली गावाला आजतगायत पाणी मिळालेले नाही.

धरण गावामध्येच बांधले गेले असून, वेरवली बुद्रुक गावातील डोळसवाडी, गुरववाडी, भालेकरवाडी, सुतारवाडी, शिमरेवाडी, बौद्धवाडी येथील ग्रामस्थांना दरवर्षी उन्हाळ्यात तीन महिने पाण्यासाठी वणवण करावी लागते. त्यामुळे धरण उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती गावावर उद्भवत असते. धरणापासून संपूर्ण गाव अवध्या एक किमी अंतरावर विस्तारलेला आहे. धरणापासून गाव जवळपास असतानाही नागरिकांना पाण्याची प्रतीक्षा करावी लागत होती.

सध्या उन्हाचा कडाका सुरू झाला असून, पाणीटंचाई उद्भवू नये यासाठी वेरवली बुद्रुक गावच्या ग्रामस्थांनी लांजा-राजापूर-साखरपाचे आमदार किरण सामंत यांची भेट घेऊन गावचा पाणीप्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी केली होती. ग्रामस्थांची समस्या लक्षात घेऊन आ. सामंत यांनी तत्काळ लघुपाट बंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून वेरवली बुद्रुक गावाला त्वरित पाणी सोडण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार रवली बुद्रुक गावाला बेर्डेवाडी धरणाच्या डाव्या कालव्याच्या माध्यमातून चौथ्या टप्प्यापर्यंत पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. धरणाच्या डाव्या कालव्याच्या माध्यमातून वेरवली बुद्रुकच्या ग्रामस्थांना पाणी मिळत असल्याने ग्रामस्थांनी आमदार किरण सामंत यांचे आभार मानले आहेत.

उजवा कालवा बंदावस्थेत
दरवर्षी कॅनॉल किंवा पाईपलाईनसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च पडलेला असताना व धरण प्रकल्प पूर्णत्वाला गेल्याचा निर्वाळा देणाऱ्या लघुपाट बंधारे विभागाकडे पाणी मागण्यासाठी नागरिकांना संघर्ष करावा लागतो हे दुर्दैव आहे. ४० वर्षे सुरू असलेल्या धरण प्रकल्पाचा नेमका उद्देश काय आहे? असा प्रश्न उपस्थित होतो आहे. आमदार किरण सामंत यांनी लक्ष दिल्याने डावा कालवा सुरू झाला. मात्र, उजवा कालवा बंदावस्थेत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:01 AM 25/Feb/2025