रत्नागिरी : गोवा, बाणकोट किल्ल्यावर उभारणार रोप वे

रत्नागिरी : दुर्गम भौगोलिक परिस्थितीमुळे आबालवृद्धांना अनेक पर्यटन ठिकाणांवर भेट देणे कठीण होते. यावर उपाय म्हणून राज्यसरकारने या पर्यटन स्थलांवर रोप-वे उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये कोकण विभागात ११ रोप-वे उभारण्यात येणार आहेत. त्यात रत्नागिरी जिल्ह्यातील गोवा किल्ला आणि बाणकोट किल्ल्याचा समावेश आहे. राष्ट्रीय राजमार्ग लॉजिस्टिक व्यवस्थापन यांच्याबरोबरीने सार्वजनिक बांधकाम विभाग हे रोप-वे उभारणार आहे.

केंद्राच्या राष्ट्रीय राजमार्ग लॉजिस्टिक व्यवस्थापन लिमिटेड (एनएचएलएमएल) आणि राज्य सरकारकडून पर्वतमाला परियोजनेंतर्गत राज्यात ४५ रोप-वेची कामे हाती घेण्यात येणार आहेत. यावर नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली आहे. राज्य सरकारकडून १६, तर ‘एनएचएलएमएल कडून २९ रोप-वेची उभारणी करण्यात येणार असल्याचे समजते. त्यातील कोकण विभागात ११, तर पुणे विभागात १९ रोप-वे असतील. रोप-वेची उभारणी करताना विविध पर्यायांचा वापर करण्यात येणार असून, त्यात ‘एनएचएलएमएल’ ला राज्य सरकारने जागा उपलब्ध करून द्यावयाची आहे. हे प्रकल्प बांधा वापरा हस्तांतरित करा या तत्त्वावर उभारण्याबाबत हालचाली सुरू आहेत.

कोकणातील रोप वे प्रकल्पांमध्ये मंडणगड तालुक्यातील बाणकोट आणि दापोलीतील हर्णे (गोवा) किल्ल्याचा समावेश आहे. गोवा किल्ला जलदुर्ग असल्यामुळे तिथपर्यंत जाणे अनेक पर्यटकांना अडचणीचे ठरते. दरवर्षी हजारो पर्यटक याठिकाणी भेट देण्यासाठी येतात. या किल्ल्याचा समुद्राकडील भागही ढासळला आहे. त्याची दुरुस्ती पुरतत्त्व विभागाकडून सुरू आहे. त्यासाठी साडेसहा कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. भविष्यात तिथे रोप वे झाला, तर हा किल्ला पर्यटकांसाठी पर्वणीच ठरू शकतो. खाडी किनारी हा किल्ला असल्पामुळे पर्यटकांच्या पसंतीस पडतो. या किल्ल्याची दुरुस्ती करण्यात आल्यामुळे तिथे पर्यटकांचा राबता वाढत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:47 PM 25/Feb/2025