रत्नागिरी : पाण्याअभावी जिल्ह्यातील रब्बी हंगामातील पीक क्षेत्र एकूणच कमी आहे तृणधान्य, कडधान्य, भाजीपाला गळीत धान्य मिळून एकूण लागवड हजार ११४.४२ हेक्टर क्षेत्रांवर आहे. खरिपातील भातकापणीनंतर जमिनीच्या अंगभूत ओलाव्यावर कुळीथ पिकाची लागवड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर केली जाते. ८८२.६९ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली होती. यावर्षी पावसाळा लांबल्यामुळे जमिनीतील ओलावा चांगला टिकून राहिल्याने पीक चांगले आले आहे. तरीही यावर्षी किलोचा दर शंभर ते दीडशे रुपयांपर्यंत राहण्याची शक्यता आहे.
कुळीथ पीक तयार झाल्यामुळे काढणी सर्वत्र जोरात सुरू आहे. सकाळी किंवा सायंकाळीच कुळीथ काढावा लागतो. अन्यथा, उन्हात शेंगा फुटण्याचा धोका असतो. एकाचवेळी पीक तयार झाल्याने मजूर मिळनासे झाले आहेत.
भातकापणी केल्यानंतर जमिनीतील ओलाव्यावर कुळिथाची पेरणी केली जाते. तीन ते साडेतीन महिन्यांत पीक तयार होते. या पिकाला जास्त पाण्याची आवश्यकता भासत नाही, शिवाय विशेष परिश्रमही लागत नसल्यामुळे कुळीथ लागवड शेतकरी करतात. हे पीक हाताशी आले असून, काढणी आणि झोडणीचे काम सुरू आहे. जिल्ह्यातील नऊ तालुक्यांपेक्षा रत्नागिरी तालुक्यात कुळीथ लागवडीचे क्षेत्र सर्वाधिक आहे. एकूण ५४० हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली आहे.
कुळीथ खाणे पोषक
कुळीथमध्ये लोह आणि कॅल्शियमचे प्रमाण अधिक आहे. शरीरातील रक्त व हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढविण्यासाठी कुळीथ खाणे फायदेशीर आहे. शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते. फ्लेबोनॉईट व पोलिफेनॉईल हे घटक असल्यामुळे यकृत व स्वादुपिंडाच्या कार्यासाठी कुळीथ खाणे पोषक ठरते. युरिन इन्फेक्शन, मुळव्याधींनी सेवन करावे, असे तज्ज्ञांचे मत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:52 PM 25/Feb/2025














