देशाच्या प्रगतीसाठी साक्षरता अभियान आवश्यक : गटविकास अधिकारी विनोदकुमार शिंदे

संगमेश्वर : प्रत्येकाला साक्षर करणे हे आपले कर्तव्य असून देशाच्या प्रगतीसाठी साक्षरता अभियान गरजेचे आहे. संगमेश्वर तालुकास्तरीय उल्लास मेळाव्याला मिळणारा मोठा प्रतिसाद व यातून अक्षरांची ओळख होऊन नवसाक्षरांचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल व त्यांचे जीवन यशस्वी होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन संगमेश्वर पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी विनोदकुमार शिंदे यांनी केले. संगमेश्वर तालुकास्तरीय उल्लास नवभारत साक्षरता मेळाव्यात ते बोलत होते.

यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी तानाजी नाईक, शशिकांत त्रिभुवणे, केंद्रप्रमुख अभिमन्यू शिंदे, सुनील करंबळे आदींनी नवभारत साक्षरतेवर आधारित मार्गदर्शन केले.

नवभारत साक्षरतेचे महत्त्व, मेळाव्याचा हेतू, स्पष्ट करून अक्षर व अंक ओळख तसेच त्यांना विविध उपक्रमातील साध्या क्लृप्त्या वापरून व साक्षरांना सहजपणे समजेल अशा पद्धतीने समजावून द्या. नव साक्षरांसाठी अक्षर अंक लेखन, वाचन परिपूर्ण घेऊन पर्यायाने देश कार्यास मदत करा, अशा प्रकारचे आवाहन व मार्गदर्शन केले.

शाळा देवरुख क्र. २ येथे नियोजन करून मेळाव्याच्या निमित्ताने शैक्षणिक साहित्याचे अनेक स्टॉल शिक्षकांनी उभारले होते. यामध्ये जुने पारंपरिक खेळ व अलीकडील नवीन खेळ उदा.करवंटीची लगोरी व आत्ताची खेळातील रंगीत लगोरी, पूर्वीची चेंडू आणि फळी आणि आत्ताचे क्रिकेट, अशा प्रकारचे खेळ सांगून नवसाक्षरांना सहज समजेल असे शैक्षणिक साहित्याचे स्टॉल वाराची कुंडी, अंकाची कुंडी, आपले शेजारी, नातेसंबंध, आपले कुटुंव, घड्याळ, कालमापन, फळांची, फुलांची नावे, वाचनपाटी, स्वच्छता संदेश, नोटांची ओळख, अंक वाचन, अक्षर वाचन, वेळेची बचत इत्यादीवर आधारित ४० ते ४५ स्टॉल शिक्षकांनी उभारले होते.

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळा देवरुख नंबर दोन मधील सर्व शिक्षक, तालुक्यातील शिक्षक, सर्व केंद्र प्रमुख, सर्व शिक्षण विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांनी परिश्रम घेतले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:50 PM 25/Feb/2025