रत्नागिरी : भारताचे संविधान आदर्शवत आहे. कारण ते प्रत्येकाचा विचार करते. आपले संविधान समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देणारे आहे, असे गौरवोद्गार नौदलाचे निवृत्त नागरी अधिकारी श्रीकांत रांगणेकर यांनी काढले.
कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे भारतरत्न डॉ पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र रत्नागिरी उपकेंद्र येथे संविधान गौरव दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात संविधान पूजनाने झाली. मुक्तस्वाध्याय केंद्राचे समन्वयक स्वरूप काणे यांच्या हस्ते श्रीकांत रांगणेकर यांचा शाल, श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
रांगणेकर पुढे म्हणाले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विद्वत्ता महान होती. त्यांनी प्राप्त केलेल्या उपाध्या, पदव्या आणि कीर्ती मेहनतीच्या जोरावर केली होती. त्यामुळेच संविधान हे सर्वसमावेशक झाले. आपण भारताचे नागरिक या नात्याने संविधानाचे स्वरूप आपल्या व्यवहारातून आणि कृतीतून पदोपदी जपणे आवश्यक आहे.
कार्यक्रमात योगशास्त्र विभागातील विद्यार्थिनी पूर्वा पावसकर आणि ज्ञानदा पोकळे यांनी संविधान निर्मितीच्या बाबतीत भाष्य केले. कार्यक्रमाला योगशास्त्र व संस्कृत विभागातील विद्यार्थी, उपकेंद्रातील प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:05 25-02-2025














