राजापूर : मुंबई गोवा महामार्गावरील उन्हाळे गंगातीर्थ फाट्यानजीक असलेल्या टपरीमुळे पिकअप शेडचे काम रखडले होते. राज्याचे मत्स्य व बंदरविकास मंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे संपर्क मंत्री नीतेश राणे यांच्या सूचनेनुसार प्रशासनाने हा खोका तात्काळ हटविला. त्यामुळे आता पिकअप शेडचे काम मार्गी लागणार आहे.
तालुक्यातील मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे बहुतांश काम पूर्ण झाले असले तरी महामार्गावर एसटी थांबे असलेल्या अनेक ठिकाणी पिकअप शेड नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत होती. दरम्यान, आमदार नीलेश राणे यांच्या माध्यमातून काही एसटी पिकअप शेड मंजूर झाल्या असून काही शेडची कामेदेखील पूर्ण झाली आहेत. यामध्ये गंगातीर्थ फाटा येथील पिकअप शेडचाही समावेश होता, मात्र ज्या ठिकाणी पिकअप शेड बांधण्यात येणार आहे त्या ठिकाणी दुकानगाळा उभारण्यात आल्याने पिकअप शेड उभारताना अडचण निर्माण झाली होती.
प्रवासी शेडअभावी मात्र प्रवाशांना उन्हात उभे राहावे लागत होते. त्यामुळे याबाबत योग्य ती कारवाई करण्याची मागणी उन्हाळे ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग याच्याकडे केली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वी राज्याचे मत्स्य व बंदरविकास मंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे संपर्क मंत्री श्री राणे यांची भेट घेऊनही निवेदन सादर केले होते. त्यानंतर श्री राणे यांनी सदर दुकान खोका तत्काळ हटवून पिकअप शेडचे काम मार्गी लावण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या होत्या.
त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, प्रशासनाने काल पोलिस बंदोबस्तात ती टपरी काढून टाकली. त्याबदल उन्हाळे ग्रामस्थांकडून श्री राणे यांना धन्यवाद दिले आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:21 PM 26/Feb/2025














