राजापूर : संगनाथेश्वर मंदिरालगत अर्जुना नदीपात्रात साचलेला गाळ काढण्याची मागणी

राजापूर : राजापूर तालुक्यातील रायपाटण येथील संगनाथेश्वर मंदिराजवळ अर्जुना नदीपात्रातील गाळ काढण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

नदीचे पात्र मोठ्या प्रमाणावर गाळाने भरल्याने महापुराचे पाणी बाजूलाच असलेल्या पुरातन शिव मंदिरात अनेकदा भरले आहे.

त्यामुळे नदीपात्रातील गाळ उपसण्याचा मुद्दा प्रामुख्याने ऐरणीवर आला आहे. संगनाथेश्वर मंदिराचा परिसर निसर्गरम्य असून आजूबाजूला कमालीची शांतता आहे. खळखळाट करीत वाहणारी अर्जुना नदी आणि नदीपलीकडे पसरलेले घनदाट अरण्य असा निसर्गरम्य परिसर लाभल्याने येथे भाविक सतत येत असतात. शिवाय येथील श्रीसंगनाथेश्वर अर्थातच ग्रामीण प्रचलित भाषेतील संगोबा हे अत्यंत पुरातन मंदिर असून १६६४ साली मंदिराचा जीर्णोद्धार झाल्याचा शिलालेख मंदिराच्या समोरील भागात आहे.

अशा या मंदिर परिसरातून वाहणाऱ्या अर्जुना नदीचे पात्र साचलेल्या गाळाने भरले असून मोठ्या प्रमाणावर गाळाचे थर दिसून येतात. काही वर्षांपूर्वी हे पात्र मोकळे होते. मात्र मागील काही वर्षांत ते पात्र गाळाने भरले आहे. अर्ध्याअधिक पात्रात गाळ साचला आहे. तेथे आणखी एक वहाळ अर्जुनेला येऊन मिळतो. पावसाळ्यात दोन्ही बाजूंनी येणारे महापुराचे पाणी संगनाथेश्वर मंदिर परिसरात बाहेर पडते. अनेक वेळा महापुराचा पुरातन शिव मंदिराला वेढा बसतो. मंदिरात पुराचे पाणी भरते व नुकसानदेखील होते. गर्भगृहातील शिवपिंडी पाण्याखाली जाते. पावसाळ्यात अनेकदा असे घडते. दोन वर्षांपूर्वी मंदिराच्या छपरापर्यंत पुराचे पाणी पसरल्याने विद्युतीकरण जळून गेले होते.

महापुराचा बंदोबस्त करायचा असेल तर नदीपात्रात साचलेला गाळ उपसणे आवश्यक आहे. त्यासाठी शासन, प्रशासनाने गाळ उपशाच्या कामाला मंजुरी देऊन लवकरात लवकर काम पूर्ण करावे, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:57 26-02-2025