रत्नागिरी : ढगाळ वातावरणामुळे हापूसवर कीडरोगांचा प्रादुर्भाव

रत्नागिरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने हजेरी लावल्यानंतर मंगळवारी (ता. २५) रत्नागिरीत ढगाळ वातावरण होते. त्यामुळे करपा, बुरशीसह थ्रिप्सचा (फूलकीड) प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी बागायतदारांना फवारणी करण्यावर भर द्यावा लागणार आहे. त्यामुळे उत्पादन खर्चात वाढ होईल, असे आंबा बागायतदारांनी सांगितले.

मागील आठवडयात रत्नागिरी जिल्ह्यात उष्मा वाढलेला आहे. १४ फेब्रुवारीला ३७.६ अंश सेल्सियस तापमान नोंदले गेले, त्यानंतर २१ रोजी ३८.७ अंश, तर २४ रोजी ३८.९ अंश तापमान होते. या महिन्यातील सर्वाधिक नोंद सोमवारी झालेली होती. काल पारा ३७.० अंशावर होता. गेल्या पंधरा दिवसांत पारा ३६ ते ३८ अंश सेल्सियस दरम्यान राहिलेला आहे. त्याचा परिणाम हापूसवर होत असतानाच मंगळवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. सूर्यदर्शनच झालेले नाही; मात्र हवेतील उष्मा कमी झाला नव्हता.

या वातावरणामुळे पाऊस पडेल की, काय असा अंदाज व्यक्त केला जात आहे. रविवारी सायंकाळी सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस पडला होता. त्यानंतर रत्नागिरीतील वातावरण बिघडल्यामुळे आंबा बागायतदार धास्तावलेले आहेत.

यंदा हंगाम दरवर्षीच्या तुलनेत विलंबाने आणि कमी कालावधीचा राहील, अशी अटकळ बांधली जात आहे. त्यात ढगाळ वातावरणाची भर पडल्याने हापूसवर करपा, बुरशी, थ्रिप्सचा प्रादुर्भाव वाढणार आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी बागायतदारांना कसरत करावी लागणार आहे.

Ratnagiri Khabardar add image

सध्या कलमांवर शेवटच्या टप्प्यातील मोहोर असून, त्यावर थ्रीप्सची लागण झाली तर कॅनिंगला मिळणाऱ्या मालात घट होईल, थ्रिप्समुळे कैरी खराब होते आणि फळ चिकूच्या आकाराचे होते. सफेद बुरशीमुळे फळाचा देठ खराब होऊन गळ होते. हे रोखण्यासाठी फवारणी करावी लागणार आहे. त्यासाठी खर्च वाढणार आहे. ढगाळ वातावरण कीडरोगांसाठी पोषक ठरणार आहे. – उमेश रहाटे, आंबा बागायतदार

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:05 PM 26/Feb/2025