राजापूर : अर्जुना नदीच्या गाळामुळे पुराचे पाणी शिरते मंदिरात

राजापूर : तालुक्यातील रायपाटण येथील संगनाथेश्वर मंदिराजवळ अर्जुना नदीचे पात्र मोठ्याप्रमाणावर गाळाने भरल्याने महापुराचे पाणी बाजूलाच असलेल्या पुरातन संगनाथेश्वर मंदिरात भरण्याचे प्रकार मागील काही वर्षांत घडले आहेत. त्यामुळे नदीपात्रातील गाळ उपसण्याचा मुद्दा प्रामुख्याने ऐरणीवर आला आहे.

रायपाटण मधील संगनाथेश्वर मंदिराचा परीसर हा निसर्गरम्य असून, आजूबाजूला कमालीची शांतता आहे. लगतच अवखळपणे खळखळाट करीत वाहणारी अर्जुना नदी आहे. नदीपलीकडे पसरलेले घनदाट अरण्य असून, असा निसर्गरम्य परिसर लाभल्याने येथे भाविक सतत येत असतात. शिवाय येथील श्री संगनाथेश्वर अर्थातच ग्रामीण प्रचलित भाषेतील संगोबा हे अत्यंत पुरातन मंदिर असून, सन १६६४ साली मंदिराचा जीर्णोद्धार झाल्याचा मंदिराच्या समोरील भागात लावलेल्या शिलालेखावरुन समजते.

अशा या मंदिर परिसरातून वाहणाऱ्या अर्जुना नदीचे पात्र साचलेल्या गाळाने भरले आहे. या ठिकाणी आणखी एक वहाळ अर्जुनला येऊन मिळतो त्यामुळे पावसाळी दिवसात दोन्ही बाजूने येणारे पुराचे पाणी संगनाथेश्वर मंदिर परिसरात शिरते. अनेक वेळा महापुराचा त्या पुरातन शिव मंदिराला वेढा असतो. मंदिरात पुराचे पाणी भरते व नुकसान देखील होते. आतील गर्भगृहातील शिवपिंडी पाण्याखाली असते, असे प्रकार पावसाळी दिवसात कधी ना कधी घडले असतात.

दोन वर्षांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीनंतर अर्जुना नदीला आलेल्या महापुराचे पाणी मंदिराच्या छपरापर्यंत आले होते. यामुळे आतील विद्युत यंत्रणा बाधित होती.

पुराचा कायमचा बंदोबस्त करायचा असेल तर नदीपात्रात साचलेला गाळ उपसा करणे अवश्यक आहे. त्यासाठी शासन, प्रशासनाने येथील गाळ उपशाच्या कामाला मंजुरी देऊन लवकरात लवकर काम पूर्ण होईल त्यादृष्टीने प्रयत्न करावेत, अशी जोरदार मागणी रायपाटण येथील ग्रामस्थांनी केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:11 AM 27/Feb/2025