मुंबई : ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य एक तो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढा जगात माय मानतो मराठी’
आज संपूर्ण महाराष्ट्रासाठी आनंदाचा दिवस आहे, कारण आपल्या मातृभाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे, असे प्रतिपादन विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार गुरुवारी यांनी केले.
ते म्हणाले, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा हा प्रस्ताव गेली १० वर्ष केंद्र सरकारकडे प्रलंबित होता. महाराष्ट्रात आघाडी सरकार असताना मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणजी यांनी मराठी भाषेबाबत तज्ञांचा अहवाल केंद्राकडे सादर केला होता. ज्येष्ठ साहित्यिक श्री.रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली मराठी भाषा तज्ञ संशोधकांची समिती १० जानेवारी २०१२ रोजी स्थापन केली होती. त्या समितीने संशोधन करून अहवाल राज्य सरकारला दिला होता.
निवडणुकीत पराभव ही एकमेव गोष्ट आहे ज्यामुळे केंद्र सरकार निर्णय घेते, हे स्पष्टच आहे. निवडणुकीत पराभवाच्या भीतीने का होईना आज आपल्या मायबोलीला मानाचे स्थान मिळाले आहे, दहा वर्षाची प्रतीक्षा आज संपली, असे ते गुरुवारी म्हणाले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:10 04-10-2024