रत्नागिरी, दि. ३० मे : रत्नागिरी तालुक्यातील कासारवेली येथील रहिवासी आणि मासेमारी बोटीवर सुतारकाम करणारे चंद्रकांत यशवंत गोळपकर (वय ६०) यांचा कामादरम्यान झालेल्या अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात बी.एन.एस.एस. कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, चंद्रकांत गोळपकर हे दि. २८ मे २०२६ रोजी दुपारी सुमारे १२.४५ वाजण्याच्या सुमारास मासेमारी बोटीवर सुतारकाम करत होते. त्यावेळी बोटीला होल पाडण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ड्रिल होल पान्यावर अचानक जोराचा आघात झाल्याने तो पाना गोळपकर यांच्या छातीवर आदळला.
या घटनेत त्यांच्या छातीला दुखापत झाली. दुखापतीनंतर त्यांना चक्कर येऊन ते बेशुद्ध पडले. त्यानंतर बोट मालक आणि सहकारी अरुण कामटेकर यांनी तत्काळ त्यांना उपचारासाठी रत्नागिरी येथील परकार हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
मात्र, डॉक्टरांकडून उपचार सुरू असतानाच दुपारी १.४६ वाजण्याच्या सुमारास चंद्रकांत गोळपकर यांचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले. या घटनेमुळे कासारवेली परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. मासेमारी बोटीवरील काम करताना सुरक्षिततेच्या उपाययोजनांचे महत्त्व या घटनेमुळे पुन्हा अधोरेखित झाले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:51 30-05-2026














