रमजान, होळी सण शांततेत साजरे करून राजापूरची शांततेची व सलोख्याची परंपरा कायम जपा : प्रभारी पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर

राजापूर : आगामी काळात येणारे रमजान, होळी व शिवजयंती हे सण व उत्सव शांततेत साजरे करून राजापूरची शांततेची व सलोख्याची परंपरा कायम जपा असे आवाहन राजापूरचे प्रभारी पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर यांनी केले आहे.

सोमवारी राजापूर तालुका शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी खेडकर यांनी मार्गदर्शन करताना या सण व उत्सव काळात योग्य ती खबरदारी घ्या व शांततेत साजरे करा असे आवाहन केले.

यावेळी उपस्थित सदस्यांनी शहरातील वाहतुक कोंडी, महामार्गवार वाहतुकीला अडथळा होईल अशा प्रकारे लावले जाणारे जाहिरात फलक, शहरातील मोकाट गुरे व उनाड कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शहरातील कै. भिकाजीराव चव्हाण उद्यान व अन्य काही सार्वजनिक ठिकाणी होणारे गैरप्रकार, तर अल्पवयीन वाहन चालकांकडून होणारे नियमांचे उलंघन, वाहनांना कर्णकर्षक हॉर्न लावून काढले जाणारे आवाज, तसेच वारंवार खंडीत होणारा विजपुरवठा यांसह अन्य प्रश्नांबाबत चर्चा केली.

यावर संबंधित विभागांना योग्य ती कार्यवाही करण्याच्या सुचना देण्यात येतील असे खेडकर यांनी सांगितले. तर पोलीस प्रशासनानाशी निगडीत प्रश्नांबाबत तात्काळ कार्यवाही केली जाईल अशी ग्वाहीही खेडकर यांनी दिली. पोलीसांशी तातडीने संपर्क साधता यावा यासाठी पोलीस स्थानकातील ०२३५३ २३२३३३ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले.

राजापूर शहर व तालुक्यात दरवर्षी होणाऱ्या या सण व उत्सर्वामध्ये पारंपारिक व सामाजिक परंपरांची जपणुक करून साजरे केले जातात. त्याच पध्दतीने ते साजरे केले जावेत व कायदा आणि सुव्यवस्थेबरोबरच जातीय सलोख्याची परंपराही अबाधित राखावी असे आवाहन खेडकर यांनी केले. या बैठकीला सर्व शांतता समिती सदस्य उपस्थित होत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:17 PM 04/Mar/2025